पैशांची चणचण, घरच्यांचा विरोध; ४ जोडी चपलांच्या मदतीनं उभी केली ६०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 09:12 AM2023-08-30T09:12:29+5:302023-08-30T09:34:46+5:30

या ब्रँडचं नाव तुम्ही प्रत्येकानं ऐकलं असेल. आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची कंपनी उभी केली.

आज आम्ही ज्या ब्रँडची यशोगाथा सांगणार आहोत त्या ब्रँडचं नाव जवळपास प्रत्येकानं ऐकलं असेल. पण ज्यानं तो ब्रँड बनवला त्यांना फार कमी लोक ओळखतील. आम्ही सर्वांच्या आवडत्या फुटवेअर ब्रँड लिबर्टीबद्दल सांगत आहोत. आज त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे.

याची सुरूवात १९४४ मध्ये पीडी गुप्ता आणि डीपी गुप्ता यांनी चार जोडी चपलांसह झाली होती. दोन्ही भावांचे हरियाणातील कर्नाल येथील कमिटी चौकात पाल बूट हाऊस नावाचं दुकान होतं. त्याकाळी चपला हातानं बनवल्या जात असल्यानं त्या बनवणाऱ्यांना दिवसात केवळ चार जोड चपला तयार करता येत होत्या. त्या विकून दोन्ही भाऊ कुटुंबाचा खर्च भागवत होते.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर लिबर्टीचा पाया रचला गेला आणि त्याच्या नावाचा संबंध त्या काळातील परिस्थितीशीही होता. कर्नाल, हरियाणा येथून लिबर्टी शू लिमिटेड देखील स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

देशातील लोकांना चांगली उत्पादनं उपलब्ध करून देणे आणि त्यांना परदेशी ऐवजी स्वदेशी ब्रँड वापरायला प्रवृत्त करणं हा त्याचा उद्देश होता. स्वातंत्र्यानंतर हळूहळू कॉर्पोरेट संस्कृतीला देशात चालना मिळू लागली.

पीडी गुप्ता आणि डीपी गुप्ता 'पाल बूट हाऊस' चपलांचं दुकान चालवायचे. त्यांच्याकडे रोज चार जोडे चपला बनवल्या जात. त्यांच्या या व्यवसायाची सर्वांनी खिल्ली उडवली, अगदी घरच्यांनीही विरोध केला. जेव्हा त्यांचा पुतण्या राजकुमार बन्सलने १९५४ मध्ये व्यवसायात प्रवेश केला तेव्हा त्यांनी काही मशीन्स विकत घेतल्या गेल्या आणि आणखी शूज बनवण्यास सुरूवात केली.

या व्यवसायाचं नाव 'लिबर्टी शूज' ठेवण्यात आलं. त्यानंतर हा प्रवास कधीच थांबला नाही. तीस वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या नावात 'पब्लिक लिमिटेड' जोडलं गेले. दररोज चार जोड्या बनवण्यापासून सुरू झालेली ही कहाणी दररोज ५० हजार जोड्यांपर्यंत पोहोचली आहे.

१९९० च्या दशकात कॅज्युअल फुटवेअरचा ट्रेंड झपाट्यानं वाढला. त्याच वेळी कंपनीनं 'फोर्स १०' लाँच केला, जो कंपनीचा पहिला सब-ब्रँड होता. कालांतरानं हा कंपनीचा फ्लॅगशिप ब्रँड सिद्ध झाला. त्याच्या यशाने कंपनीला आणखी ९ सब-ब्रँड सुरू करण्यास प्रोत्साहन दिलं. आता ती भारतातील दुसरी सर्वात मोठी फुटवेअर कंपनी बनली होती. यादरम्यान 'बाटा' पहिल्या क्रमांकावर होती.

यासोबतच कंपनीचा व्यवसाय अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये पसरलेला आहे. याची सुरुवात १९६४ मध्ये हंगेरीच्या ऑर्डरने झाली. त्यानंतर विस्तार होत गेला.

दरम्यान, एक वेळ अशी आली की कंपनीला आपल्याच लोकांच्या विरोधाला सामोरं जावं लागले. या कठीण काळातही दोन्ही भावांनी हार मानली नाही आणि पुढे जात राहिले. त्याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. आज लिबर्टीमध्ये ४ हजार कर्मचारी आणि १५ हजार असोसिएट्स कर्मचारी आहेत. कंपनीचे जगभरात ४०७ आउटलेट आहेत. कंपनीचे केवळ भारतात १५० वितरक आहेत.