स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:42 IST2025-04-30T10:28:42+5:302025-04-30T10:42:11+5:30
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाले. पण पाकिस्तानमध्ये ३२ वर्षांची लष्करी राजवट म्हणजेच मार्शल लॉ होता. यामुळे लष्कर अधिकाधिक ताकदवान झालं. लष्करी अधिकाऱ्यांकडे भरपूर जमीन आणि पैसा आहे. पाकिस्तानात पैसा कमावण्यासाठी आणि जमीन मिळवण्यासाठी लष्कर सर्वात योग्य मानलं जातं.

Pakistan Army Business: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचा निर्धार केलाय. लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी हा कट रचला असल्याचं मानलं जात आहे.
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाले. पण पाकिस्तानमध्ये ३२ वर्षांची लष्करी राजवट म्हणजेच मार्शल लॉ होता. यामुळे लष्कर अधिकाधिक ताकदवान झालं. लष्करी अधिकाऱ्यांकडे भरपूर जमीन आणि पैसा आहे. पाकिस्तानात पैसा कमावण्यासाठी आणि जमीन मिळवण्यासाठी लष्कर सर्वात योग्य मानलं जातं.
लष्कर हे पाकिस्तानातील सर्वात मोठे भूमाफिया मानलं जातं. इतकंच नाही तर देशातील अनेक व्यवसायही त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. पाकिस्तान सरकारनंच संसदेत दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर देशात सुमारे ५० कंपन्या चालवत आहे. पाकिस्तानचे लष्कर हे जगातील एकमेव असं सैन्य आहे, ज्याचा व्यवसाय देश-विदेशात पसरलेला आहे. पाकिस्तानी लष्करानं यासाठी पाच ट्रस्ट स्थापन केलेत. यामध्ये आर्मी वेल्फेअर ट्रस्ट, फौजी फाऊंडेशन, शाहीन फाऊंडेशन, बहरिया फाऊंडेशन आणि डिफेन्स हाऊसिंग ऑथॉरिटीज यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी लष्कर हे देशातील सर्वात मोठं बिझनेस हाऊस आहे. पेट्रोल पंपांपासून औद्योगिक पार्क, बँका, बेकरी, शाळा, विद्यापीठं, विमा, खतं, होझरी कंपन्या, डेअरी फार्म आणि सिमेंट प्लांटपर्यंत सर्व काही ते चालवतात. व्यवसायातून मिळणारा नफा निवृत्त सैनिकांमध्ये वाटला जातो. संसदेत दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कराचा व्यवसाय सुमारे ४० अब्ज डॉलरचा आहे, जो देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळपास १० टक्के आहे. पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडचे मार्केट कॅप ३.१८ अब्ज डॉलर आहे. पाकिस्तानचे लष्कर हे देशातील सर्वात मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. देशभरात त्यांचे ५० हून अधिक गृहप्रकल्प आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार राजधानी इस्लामाबादमध्ये लष्कराची १६ हजार एकर तर कराचीत १२ हजार एकर जमीन आहे. देशात लष्करी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर भूखंड भेट म्हणून दिले जातात. कराची, लाहोर, रावळपिंडी-इस्लामाबाद, मुल्तान, गुजरांवाला, बहावलपूर, पेशावर आणि क्वेटा या देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये डिफेन्स हाऊसिंग ऑथॉरिटी स्थापन करण्यात आली आहे. म्हणजेच या ट्रस्टच्या माध्यमातून देशात जमिनीचं वाटप केलं जाते. पाकिस्तानी लष्कर कॅन्टोन्मेंट परिसरात तसेच प्रमुख शहरांतील पॉश भागात आपल्या लोकांना जमीन वाटप करतं.
आर्मी वेल्फेअर ट्रस्ट १६ कंपन्या चालवते, तर फौजी फाऊंडेशन १५ कंपन्या चालवते. हवाई दलाच्या शाहीन ट्रस्टच्या ११ कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे बहरिया फाऊंडेशन ही निवृत्त नौदल अधिकाऱ्यांची ट्रस्ट आहे. क्रेडिट सुईसनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या किमान २५ निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची स्विस बँक खाती आहेत. या खात्यांमध्ये सुमारे ८० हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता आहे. त्यात आयएसआयचे माजी प्रमुख अख्तर अब्दुर रेहमान खान यांचाही समावेश असून त्यांच्या खात्यात १५ हजार कोटी रुपये जमा आहेत. देशातील अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांनी परदेशात मोठी गुंतवणूक केली आहे.
पनामा पेपर्स लीकनुसार निवृत्त लेफ्टनंट जनरल शफात शाह यांची लंडनमधील पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती उघड झाली आहे. परवेझ मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना शफात शाह हे सेकंड इन कमांड ऑफिसर होते. त्याचप्रमाणे आयएसआयचे माजी प्रमुख मेजर जनरल नुसरत नईम यांच्या २७०० कोटी रुपयांच्या ऑफशोर कंपन्याही समोर आल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर देशभरात पेट्रोल पंपांची चेनही चालवते. निवृत्तीनंतर लष्करी अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्या नावे पेट्रोल पंप घेतात. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या नातेवाईकांसाठी पेट्रोल पंपही मिळतात.