कशी झाली देशातील सर्वात मोठी बँक SBI ची सुरूवात, २०० वर्षांचा इतिहास; नोट छापण्याचाही होता अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 01:20 PM2022-09-22T13:20:53+5:302022-09-22T13:50:38+5:30

१ जुलै १९५५ रोजी Imperial Bank चं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक वर्षी १ जुलै रोजी एसबीआय देश विदेशातील शाखांमध्ये स्थापना दिवस साजरा करते.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेचा इतिहास 200 वर्षांपेक्षाही जुना आहे. आज ज्या बँकेला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखतो, त्याचं यापूर्वी नाव इम्पिरिअल बँक ऑफ इंडिया असं होतं. या बँकेचा पाया ब्रिटिश शासनकाळात रचला होता. आज ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.

स्टेट बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँकेची सुरूवात 1806 मध्ये कोलकात्यात करण्यात आली. ब्रिटिश काळात त्यावेळी बँक ऑफ कलकत्ताची स्थापना करण्यात आली. तीन वर्षांनंतर बँकेला चार्ट प्राप्त झआला आणि २ जानेवारी १८०९ मध्ये याला बँक ऑफ बंगाल असं नाव देण्यात आलं.

त्यानंतर याचा विस्तार करण्यात आला. त्याच दशकात 15 एप्रिल 1840 मध्ये मुंबईत बँक ऑफ बॉम्बेची स्थापना करण्यात आली. तर 1 जुलै 1843 रोजी बँक ऑफ मद्रासची सुरूवात करण्यात आली. विशेषकरून या कंपनीची सुरूवात ईस्ट इंडियासाठी करण्यात आली होती. यानंतर 27 जानेवारी रोजी बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रासचं बँक ऑफ बंगालमध्ये विलिनीकरण करण्यात आलं. त्यानंतर तिन्ही बँकांचं विलिनीकरण करून इम्पिरिकल बँक ऑफ इंडिया सुरू झाली.

इम्पिरिअल बँक ऑफ इंडिया बनण्यापूर्वी म्हणजेच विलिनीकरणापूर्वी तिन्ही बँक स्वतंत्रपणे काम करत होत्या. 1823 मध्ये या तिन्ही बँका सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या. 1861 पूर्वी तिन्ही बँकांना नोटा छापण्याचा अधिकार होता. हा अधिकार त्यांना 1861 च्या पेपर करन्सी अॅक्टनुसार देण्यात आला होता. ब्रिटिश काळात त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं.

स्वातंत्र्यानंतरही इम्पिरिकल बँकेचं अस्थित्व होतं. 1955 मध्ये रिझर्व्ह बँकेनं इम्पिरिकल बँक ऑफ इंडियाचं पार्लियामेंटरी अॅक्ट अंतर्गत अधिग्रहण केलं. असं करण्यासाठई स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्ट 1955 आणण्यात आलं. 30 एप्रिल 1955 ला मोठा बदल करण्यात आला आणि इम्पिरिकल बँकेचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं.

नव्या नावानंतर 1 जुलै 1955 रोजी अधिकृतरित्या स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली. इम्पिरिकल बँकेचे देशातील सर्व 480 ऑफिसांचं नाव एसबीआय झालं. यामध्ये ब्रान्च ऑफिस, सब ब्रान्च ऑफिस आणि ती लोकल हेडक्वार्टर्स होते. त्याच वर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट पारित करण्यात आला. त्यानंतर 1955 रोजी स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँकेची पहिली सहयोगी बँक बनली. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया (सब्सिडायरी बँक) अॅक्ट 1959 पारित करण्यात आला.