“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 10:53 AM2024-05-26T10:53:13+5:302024-05-26T10:53:55+5:30

Congress Jairam Ramesh On Lok Sabha Election 2024: इंडिया आघाडीला एकूण ३५० जागा मिळणार असल्याचा दावा करत पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

congress jairam ramesh claims that india opposition alliance will win 350 seats in lok sabha election 2024 | “सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस

“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस

Congress Jairam Ramesh On Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. यातच आता सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला असून, आता भाजपाचा पराभव होऊन सत्तेतून जाणे निश्चित आहे, असा मोठा दावा करण्यात आला आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट करत सदर दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा झाला. आतापर्यंत ४८६ जागांवर मतदान झाले आहे. आता, पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी परिस्थिती अगदी स्पष्ट आहे. भाजपाचे जाणे निश्चित झाले असून, दक्षिणेत त्यांचा सुफडा साफ होत आहे. उत्तर, पश्चिम आणि पूर्वेतून ते निम्मे होत आहेत, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. 

इंडिया आघाडी ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे

पहिल्या टप्प्यापासून इंडिया आघाडीला मिळणारा जनाधार सतत बळकट होत आहे. महाराष्ट्र, यूपी, बिहार आणि दिल्लीत मतदान झाल्यानंतर आघाडीच्या घटक पक्षातील अविश्वसनीय केमिस्ट्री आपण पाहत आहोत. इंडिया आघाडीने आधीच २७२ जागांचा टप्पा ओलांडला आहे आणि एकूण ३५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. मावळत्या पंतप्रधानांचा विश्वासघात आणि हेराफेरी देशातील मतदारांना समजली आहे. भाजपाचे विजयी अभियान लवकरच संपुष्टात येत असल्याने पंतप्रधानांकडे निवृत्तीच्या योजना तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळ आहे. ते हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रचार करू शकत नाहीत. कारण त्यांच्या नेत्यांना ग्रामीण भागांतून, खेड्यांमधून हाकलले जात आहे. शेतकरी विरोधी सरकारबद्दल शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. त्यांचा या सरकारबाबत पूर्ण भ्रमनिरास झाला आहे, अशी टीका जयराम रमेश यांनी केली. 

भारतातील मतदार धडा शिकवणार आहेत

पंतप्रधानांना पराभव अगदी जवळ दिसतो तेव्हा ते आणखी भ्रामक गोष्टी बोलतात. आता म्हणतात आहे की, त्यांना देवाने पाठवले आहे. कदाचित ते त्याच्या पुढच्या कारकिर्दीत स्वतःला गॉडमॅन म्हणून पाहतात. त्यांच्या अनुयायांनीही त्यांचा मुद्दा मान्य केला आहे. पुरी येथील भाजपाचे उमेदवार संबित पात्रा म्हणाले की, भगवान जगन्नाथ हे पंतप्रधानांचे भक्त आहेत. भारतातील मतदार या दोघांना धडा शिकवणार आहेत. ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या सकारात्मक प्रचाराभोवती केंद्रित झाली. आमचे न्याय पत्र आणि आमची गॅरंटी सर्व पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत. 'खटाखट' या घोषणेने लोकांचे लक्ष इतके वेधून घेतले आहे. मावळत्या पंतप्रधानांनाही त्यावर प्रतिक्रिया देणे भाग पडले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येक व्यक्तीला मोफत अन्नधान्याचे वाटप दुप्पट करण्याच्या आमच्या घोषणेने उत्तर आणि पूर्व भारतात प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

निवडणूक आयोग झोपेतच आहे हे दुर्दैव

असे असतानाही निवडणूक आयोग झोपेतच आहे, हे दुर्दैव आहे. मावळत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भाजपा दररोज आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत आहे. मतदानात धार्मिक चिन्हांचा वापर, मतदानाच्या दिवशी जाहिराती, भाजप कार्यकर्त्यांचे मतदानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करणे या सर्वांनी निवडणूक आयोगाच्या मावळत्या पंतप्रधानांना जबाबदार धरण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदान संपल्यानंतर लवकरात लवकर मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर होईल, अशी आमची अपेक्षा आहे. फॉर्म १७सी सार्वजनिकरित्या जारी करण्यास नकार देणे हे निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेच्या आदर्शांच्या विरोधात आहे. यामुळे निवडणूक यंत्रणेवरील विश्वास कमी होतो, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

दरम्यान, प्रत्येक ग्राउंड रिपोर्टवरून हे पूर्णपणे स्पष्ट होते की, वाऱ्याची दिशा बदलत आहे. त्याने वादळाचे रूप धारण केले आहे. इंडिया आघाडी एनडीएचा पराभव करणार आहे. ४ जून येत आहे! भारत बदलेल, इंडिया आघाडी जिंकेल!, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. 
 

Web Title: congress jairam ramesh claims that india opposition alliance will win 350 seats in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.