“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 11:41 AM2024-05-26T11:41:21+5:302024-05-26T11:46:40+5:30

Manoj Jarange Patil On Farmers Issue: शेतकऱ्यांनी जागरुक झाले पाहिजे. वारंवार तेच तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची किंमत राहिलेली नाही. सरकार काही करत नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

manoj jarange patil criticized state govt over farmers issues and drought situation | “जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil On Farmers Issue: शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी नाही. एकीकडून सरकारने मारायचे दुसरीकडे निसर्गाने मारायचे, त्यामुळे करावे काय, अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर आहे. रात्रंदिवस कष्ट करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार केला, तर डोळे पांढरे होतील. कारण, त्याच्या वाट्याला तेच आले आहे. सरकार साथ देत नाही. निसर्गही साथ देत नाही. निसर्गाने साथ दिली नाही, तरी सरकारने पाठबळ द्यायला हवे. कर्जमाफी करायला हवी. पाण्याची तातडीने व्यवस्था केली पाहिजे. जनावरांना चारा नाही. सरकार आता काहीच करत नाहीत. शेतकऱ्यांनी जागरूक होणे गरजेचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वारंवार तेच तेच लोक निवडून दिल्यामुळे त्यांना किंमत राहिलेली नाही. शेतकऱ्यांनी शहाणे होणे गरजेचे आहे. मी माझ्या हितासाठी बोलत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्हीही त्यातून आलो आहोत. आम्ही आजही शेती करतो. शेतकऱ्यांनी त्यांच्या हिताची बाजू मांडणारी लोक दिली पाहिजेत. मग शेतकऱ्यांना न्याय मिळेल. पुढील काळात अवघड परिस्थिती होणार आहे, अशी भीती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. 

पैसे बुडवा असे म्हटलेले नाही

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू नये. पैसे येतील तेव्हा भरावे, यात चूक काय बोललो. मी पैसे बुडवा असे बोललो नाही. शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत, तर तो कुठून भरणार, असा सवाल करत, पैसे भरण्यासाठी शेतकरी जीव संपवायला लागलेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर तुमचे कुटुंब वाऱ्यावर पडत आहे. तुम्ही गेलात की कुटुंबही गेले. कुणाचा पाहुणा येत नाही की गावकरी येत नाहीत. शेतकऱ्यांनी माझ्या बोलण्याची भूमिका समजून घ्यावी. कुणाचेही पैसे बुडवा म्हणत नाही. तुमच्याकडे आल्यावर तुम्ही पैसे भरा. कुणावर केस केली तर न्यायालयात जा. शेतकऱ्यांनी न्यायालयात जावे. बाजू मांडावी. न्यायालय नक्कीच न्याय देईल. आत्महत्या का करत आहात, तो पर्याय नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली अनेक घरे पाहिली आहेत. शेतात काम करायला कुणी राहत नाही, येत नाही. मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. आत्महत्या केल्यावर सरकार लाख, दीड लाख रुपये देऊन त्यांची थट्टा करतात. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याची अशी थट्टा चालवली जाते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. जीवापेक्षा मोठे काही नाही. कुणी काही करू शकत नाही. खचून जाऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

Web Title: manoj jarange patil criticized state govt over farmers issues and drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.