कोरोनाच्या संकटकाळात घर घेणं झालं आणखी स्वस्त, या बँकेने गृहकर्जात अजून केली कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 05:24 PM2020-06-12T17:24:51+5:302020-06-12T17:37:17+5:30

बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊन याचा मोठा परिणाम सध्या आर्थिक व्यवहारांवर झाला आहे. मात्र यादरम्यान बँकांकडून कर्जावरील व्याजदरांमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामध्ये गृहकर्जांचाही समावेश आहे. त्यामुळे या संकटकाळात स्वस्तात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे.

देशातील अनेक बँकांनी एकापेक्षा अधिक वेळा व्याजदर घटवले आहेत. दरम्यान, गृहकर्ज देणारी संस्था असलेल्या एचडीएफसीनेसुद्धा व्याजदरांमध्ये ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. हे नवे व्याजदर १२ जून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत.

एचडीएफसीच्या या निर्णयामुळे गृहकर्ज आणि नॉन-हाऊसिंग लोनच्या ग्राहकांना फायदा होणार आहे. हे व्याजदर ७.६५टक्के ते ७.९५ टक्के राहणार आहेत.

एचडीएफसीची स्वत:ची कर्जाची गरज घटल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एचडीएफसीचे हे पाऊल एसबीआयच्या कर्जावरील व्याजदरांमध्ये कपात करण्याच्या निर्णयाच्या अनुरूप आहे.

गेल्याच महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये ०.४० टक्क्यांची कपात करून तो ४ टक्क्यांच्या खाली आणला होता.

त्यानंतर वित्तीय क्षेत्रातील कर्जाचे व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. मात्र व्याजदर कमी होत असल्याने बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवत असलेल्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. कारण त्यांना गुंतवणुकीवर कमी परतावा मिळत आहे.

दरम्यान, व्याजदर कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून कर्ज घेण्यामध्ये फारसा रस घेण्यात येत नसल्याचे समोर आले आहे.

Read in English