आधी आपटला मग सुसाट सुटला! सरकारी कंपनीचा शेअर एका वर्षात ६ पट वाढला; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 05:44 PM2024-01-30T17:44:58+5:302024-01-30T17:57:45+5:30

IFCI Stock Price: रेल्वे, उर्जा आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

शेअर बाजारात सध्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ होत आहे. रेल्वे, उर्जा आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

अशा देखील अनेक कंपन्या आहेत, ज्या इतर सरकारी कंपन्यांच्या तुलनेत तेजीत मागे राहिल्या. पण, आता या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ होत आहे. असाच शेअर सरकारी क्षेत्रातील नॉन-डिपॉझिट NBFC कंपनीचा आहे. खरं तर IFCI Limited च्या स्टॉकने मंगळवारी गुंतवणूकदारांना चांगला दिलासा दिला.

आज बरोबर ३० जानेवारी २०२३ रोजी IFCI Limited च्या शेअरची किंमत १२.१५ रूपये एवढी होती. त्यानंतर २८ मार्च २०२३ रोजी शेअर ९ रूपयांच्या पातळीवर घसरला होता.

मात्र, एका वर्षानंतर मंगळवारी बरोबर ३० जानेवारी २०२४ रोजी या स्टॉकने ६३.८५ रुपयांचा उच्चांक गाठला. केवळ एका वर्षात IFCI च्या शेअरने गुंतवणूकदारांना ४२५ टक्के मल्टीबॅगर परतावा दिला.

दरम्यान, २८ मार्च २०२३ च्या आधी ज्या गुंतवणूकदारांनी IFCI चा स्टॉक ९ रुपये किमतीला विकत घेतला होता त्यांना या शेअरने एका वर्षात ६ पट परतावा दिला आहे. एकूणच ६०९ टक्के रिर्टन्स मिळाले आहेत.

२४ वर्षांपूर्वी अर्थात २००० मध्ये IFCI स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाली होती. डिसेंबर २००७ मध्ये शेअरने ११६ रूपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर शेअरमध्ये सातत्याने घसरण होत गेली.

या शेअरने मागील अनेक वर्ष गुंतवणूकदारांना नाराज केले. परंतु इतक्या वर्षांच्या खराब कामगिरीनंतर स्टॉकने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.

IFCI ही कंपनी विविध उद्योगांना कर्जाद्वारे आर्थिक मदत करते. कंपनीने विमानतळ, रस्ते, दूरसंचार, ऊर्जा, रिअल इस्टेट, उत्पादन आणि सेवा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना कर्ज दिले आहे.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, IFSC ने अदानी समूहाच्या अदानी मुंद्रा पोर्ट, GMR चे गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सालासर महामार्ग यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना निधी दिला आहे.

कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल भाष्य करायचे झाल्यास, २०२२-२३ मध्ये कंपनीचा महसूल १४८५ कोटी रूपये होता. तर ११९ कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. परंतु, २०२१-२२ च्या तुलनेत तोट्यात घट झाली आहे, कारण तेव्हा १७६१ कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले होते.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)