भारतीयांना अनवाणी चालताना पाहून सुचली व्यवसायाची कल्पना; सुरू केली शूज फॅक्ट्री, रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 09:48 AM2023-09-12T09:48:35+5:302023-09-12T10:03:38+5:30

आजही अनेक लोक बाटा ही भारतीय कंपनी असल्याचं म्हणतात. पण असं नाही.

देशात क्वचितच असं घर असेल जिथे कोणी बाटाचे शूज किंवा चप्पल घातल्या नसतील. बाटा कंपनी आजही भारतीयांची ओळख आहे. पण बाटा हा भारतीय ब्रँड नाही हे फार कमी लोकांना माहीत असेल. पण बाटा ब्रँडमधून भारतीयांना देसी फील मिळतो. बाटानं आजवरच्या या प्रवासात खूप चढ-उतार पाहिले आहेत.

अनेकदा ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर होती. परंतु पुन्हा ही कंपनी उभी राहिली. भारतातील मध्यमवर्गीयांची पहिली आवड म्हणून ही कंपनी समोर आलीये. अनेकांना बाटा ही कंपनी भारतीय असल्याचं वाटतं. परंतु ही एक एमएनसी कंपनी आहे. आज आपण बाटाचा इथवरचा प्रवास आणि लोकांचा कंपनीवर भरवसा कसा वाढला हे पाहूया.

बाटा या कंपनीची सुरुवात झेकोस्लोव्हाकीयामध्ये झाली. ही कंपनी १८९४ मध्ये थॉमस बाटा यांनी सुरू केली. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता आणि त्यांचे कुटुंबीय बूट बनवण्याचं काम करत होतं. जेव्हा त्यांना जास्त काम मिळू लागलं तेव्हा त्यांनी कर्ज घेऊन व्यवसायाचा अधिक विस्तार करण्याचं ठरवलं.

परंतु परिस्थिती बिघडली आणि व्यवसाय ठप्प झाला. त्यांना कर्ज फेडता न आल्यानं परिस्थिती अधिक बिकट झाली. कंपनीला दिवाळखोर घोषित करण्यात आलं. यानंतर थॉमस इंग्लंडला आले आणि त्यांनी एका शू कंपनीत काम करायला सुरुवात केली. या ठिकाणी त्यांनी शूज तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी शिकून घेतल्या. नंतर आपल्या मायदेशी परतून त्यांनी हा व्यवसाय पुन्हा सुरू केला.

त्यांच्या या व्यवसायाला यश मिळालं आणि त्यांनी व्यापार वाढवण्यासाठी अन्य देशांमध्ये स्टोअर्स सुरू केली. १९२५ पर्यंत जगभरात बाटाच्या १२२ ब्रान्च सुरू झाल्या. त्यानंतर शूज सोबत त्यांनी मोजे आणि टायर बनवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता ही कंपनी बाटा समूहात बदलली.

भारतात बाटाची कहाणी अतिशय रंजक आहे. १९२० च्या दशकात थॉमस बाटा भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक भारतीय अनवाणी चालत असल्याचं पाहिलं. यामुळे त्यांना कल्पना सुचली आणि त्यांना यात व्यापाराची संधी दिसली.

१९३१ मध्ये त्यांनी बाटा शू कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली. परंतु १९३२ मध्ये त्यांचं निधन झालं. यानंतर कंपनीची धुरा बाटा यांचे भाऊ झॅन अँटोनिन बाटा यांनी सांभाळली. भारतात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी १९३७ मध्ये कोलकात्यात एक मोठी कंपनी सुरू केली. बाटा इंडियाचे भारतात आज १५०० पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत.

भारतात बाटा एक स्वदेशी ब्रँड म्हणून ओळखला गेला. मॅगझिन्स आणि पेपरमध्ये बाटाच्या जाहिरातीही येत होत्या. देशातील लोकांना चप्पल आणि शूट घालण्याची सवय लावावी हे त्यांचं मुख्य काम होतं. बाटा हे असं नाव होतं जे भारतीय सहजरित्या बोलू शकत होते.

ऐकण्यासाठीही हे विदेशी वाटत नव्हतं. यामुळेच लोकांना हा ब्रँड भारतीय वाट होता. आज जवळपास ३० हजार अन्य रिटेल दुकानांमध्ये बाटाच्या शूज आणि चपलांची विक्री केली जाते. आज तुमच्या जवळ बाटाचं शोरूम नसलं तरी तुमच्या आसपासच्या दुकानात तरी नक्कीच बाटाचे शूज किंवा चपला मिळत असतील.