ICICI Bank नं केलं गृहकर्ज स्वस्त; १० वर्षांतील सर्वात कमी व्याजदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 02:21 PM2021-03-05T14:21:50+5:302021-03-05T14:28:39+5:30

Home Loan : ICICI Bank ने केले गृहकर्जाचे दर कमी, पाहा किती आहेत नवे दर

गेल्या काही दिवसांपासून अनेक बँकांनी आपल्या गृहर्जाच्या व्याजदरात कपात केली होती. काही दिवसांपूर्वी स्टेट बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक यांनी आपलं गृहकर्ज स्वस्त केलं होतं.

यानंतर आता आयसीआयसीआय बँकेनंही आपले गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे आता घर घेणाऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.

आयसीआयसीआय बँकेनं ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचे व्याजदर कमी करून ते ६.७० टक्के इतके केले आहेत. तर दुसरीकडे ७५ लाखांपेक्षा अधिक गृहकर्ज घेतल्यास त्यासाठी ६.७५ टक्के व्याजदर आकारण्यात येतील.

हे गेल्या १० वर्षांमधील सर्वात कमी व्याजदर असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

ग्राहकांना या नव्या व्याजदराचा फायदा ३१ मार्च २०२१ पर्यंत घेता येणार आहे.

यापूर्वी बँक आपल्या ग्राहकांना ६.८ टक्के व्याजदरानं गृहकर्ज देत होती. परंतु आता यात ०.१० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी बँकेनंही आपले व्याजदर कमी केले होते.

कोटक महिंद्रा बँकेनं आपले व्याजदर ६.६५ टक्क्यांवर आणले आहेत. इतर बँकांच्या तुलनेत हे दर सर्वात कमी आहेत. दुसरीकडे स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकेनं व्याजदरात कपात करून ते ६.७० टक्के केले आहेत.

ज्या लोकांना घर घ्यायचं आहे आणि जे आयसीआयसीआय बँकेचे ग्राहकही नसतील त्यांना डिजिटली यासाठी अर्ज करता येऊ शकतं, असं बँकेनं म्हटलं आहे.

गृहकर्जासाठी बँकेची वेबसाईट आणि मोबाईल बँकिंग प्लॅटफॉर्म iMobile Pay’ द्वारेही अर्ज करता येऊ शकतो.

याशिवाय ग्राहकांना जवळच्या ब्रान्चमध्ये जाऊनही डिजिटली अर्ज करत त्वरित त्या ठिकाणी मंजुरी मिळू शकते, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी आम्ही ग्राहकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे, असं आयसीआयसीआय बँकेचे प्रमुख रवी नारायण म्हणाले.

ग्राहकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे. आम्ही ग्राहकांसाठी डिजिटल अॅडव्हान्स्ड प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे. याच्या मदतीनं गृहकर्जासाठी केवळ अर्जच करता येणार नाही, तर लगेचच त्यावर अप्रुव्हलही मिळेल, असं ते म्हणाले.

नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीआयसीआय बँक ही देशातील पहिली खासगी क्षेत्रातील बँक होती ज्याचं मॉर्गेज होम पोर्टफोलियो २ लाख कोटी रूपयांच्या पुढे गेला होता.

बँकेचं मॉर्गेज डिसबर्समेंट २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेनं वाढलं असल्याचंही बँकेनं म्हटलं, तसंच डिसेंबर २०२० मध्ये हे विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं.