नो टेन्शन! दररोज फक्त ७ रुपये भरा अन् सरकारकडून दर महिन्याला मिळवा ५ हजार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:34 PM2021-09-05T18:34:55+5:302021-09-05T18:43:14+5:30

महिन्याला ४२ ते २१० रुपये भरून महिन्याला मिळवा १ ते ५ हजार रुपये

तुमचं वय ४० वर्षांपेक्षा कमी आहे आणि तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता असेल तर अटल पेन्शन योजना तुमचं टेन्शन दूर करू शकते. आतापर्यंत देशातले ३.३० कोटी लोक या योजनेशी जोडले गेले आहेत.

पेन्शन फंड रेग्युलेटरी एँड ऍथॉरिटीनुसार (पीएफआरडीए) २५ ऑगस्टपर्यंत अटल पेन्शन योजनेशी स्वत:ला जोडून घेतलेल्यांची संख्या ३.३० कोटींवर पोहोचली. चालू आर्थिक वर्षात २८ लाख लोक योजनेशी जोडले गेले आहेत.

अटल पेन्शन योजनेत सर्वाधिक पसंती १ हजार रुपयांच्या पेन्शनला मिळत आहे. ७८ टक्के लोकांनी ही योजना निवडली आहे. तर ५ हजार रुपयांच्या पेन्शनसाठी नोंदणी करणाऱ्यांचं प्रमाण १४ टक्के आहे.

महिला आणि तरुणांनी अटल पेन्शन योजनेला पसंती दिली आहे. योजनेसाठी नोंद करणाऱ्यांमध्ये ४४ टक्के महिला आहेत. तरुणांमध्येही योजना लोकप्रिय आहे. योजनेसाठी नोंद करणाऱ्यांमध्ये ४४ टक्के जण १८ ते २५ वर्षे वयोगटातले आहेत.

अटल पेन्शन योजना केंद्र सरकारची योजना आहे. वृद्धापकाळात मदतीचा हात मिळावा या हेतूनं योजना सुरू करण्यात आली. या योजनेत दर महिन्याला ४२ रुपये ते २१० रुपये भरता येतात. त्यानंतर वृद्धापकाळात १ ते ५ हजार रुपये रक्कम महिन्याकाठी मिळते.

अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत निवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळते. योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान २० वर्षे गुंतवणूक गरजेची आहे. तुमचं वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्यास तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात.

वयाची साठी पूर्ण केल्यानंतर दर महिन्याला पेन्शन मिळावी यासाठी तुम्हाला आतापासून दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागेल. तुम्ही साठी ओलांडताच दर महिन्याला तुम्हाला पेन्शन मिळेल.

अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत महिन्याला किमान १ हजार रुपये आणि कमाल ५ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. एखाद्या १८ वर्षांच्या तरुणाला वयाची साठी ओलांडल्यानंतर दर महिन्याला ५ हजार रुपये पेन्शन हवी असल्यास त्याला महिन्याला २१० रुपये गुंतवावे लागतील.

अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत खातं उघडण्यासाठी बँकेत किंवा पोस्टात खातं असणं, आधार आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. बँक शाखेत जाऊन किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातूनही खातं उघडू शकता.

अटल पेन्शनमध्ये मासिक, तिमाही, सहामाही पद्धतीनं पैसे जमा करता येतात. दर महिन्याला बँक खात्यातून ऑटोमेटिक पैसे कापून जाण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.