पेन्शनधारकांना खूशखबर!, एकाच वेळी पेन्शन मिळण्याची शक्यता; ७३ लाख सदस्यांना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:24 IST2022-07-11T11:17:44+5:302022-07-11T11:24:18+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) २९ आणि ३० जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (ईपीएफओ) २९ आणि ३० जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे. या प्रणालीच्या स्थापनेमुळे देशभरात ७३ लाख पेन्शनधारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी जमा केले जाईल.

सध्या ईपीएफओची १३८ प्रादेशिक कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन पाठवत असतात. अशा परिस्थितीत पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी पेन्शन मिळते.

सूत्राने सांगितले की, ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) च्या २९ आणि ३० जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत केंद्रीय पेन्शन वितरण प्रणालीची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. ही प्रणाली बसविल्यानंतर १३८ क्षेत्रीय कार्यालयांच्या डेटाबेसच्या आधारे पेन्शनचे वितरण केले जाईल.

सर्व क्षेत्रीय कार्यालये त्यांच्या क्षेत्रातील पेन्शनधारकांच्या गरजांकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात. यामुळे पेन्शनधारकांना वेगवेगळ्या दिवशी पेन्शन मिळते. २० नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या सीबीटीच्या २२९ व्या बैठकीत विश्वस्तांनी डी-डीएसी द्वारे केंद्रीकृत आयटी आधारित प्रणाली विकसित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.

प्रादेशिक कार्यालयांचे तपशील टप्प्याटप्प्याने केंद्रीय डेटाबेसमध्ये हस्तांतरित केले जातील. यामुळे सेवांचे संचालन आणि वितरण सुलभ होईल, असे कामगार मंत्रालयाने बैठकीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केंद्रीय पेन्शन वितरण प्रणाली लागू झाल्यामुळे ईपीएफओ खातेधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत. यात डुप्लिकेशन होणार नाही. याचवेळी खातेधारकांची अनेक पीएफ खाती विलीन होत एकच सिंगल खाते तयार करण्यात येईल. जर कोणी नोकरी बदलत असेल तर खात्याला ट्रान्सफर करण्याचा त्रास वाचणार आहे. ज्यांनी ६ महिने ते १० वर्षे योगदान दिले आहे, त्याच सदस्यांना त्यांच्या पेन्शन खात्यातून पैसे काढणे शक्य आहे.

किती येणार पेन्शन? - सरकार लवकरच पेन्शनचे व्याज जमा करण्याची शक्यता आहे. जर तुमच्या पीएफ खात्यामध्ये ७ लाख रुपये असतील, तर आपल्याला ८.१ टक्के व्याजदराने ५६ हजार रुपये खातात जमा होतील. याचा फायदा देशभरातील ६ कोटी खातेधारकांना होणार आहे.

पैसे कधीही काढा? - सीबीटी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी योगदान दिलेल्या खातेधारकांना पेन्शन खात्यातून ठेवी काढण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर देखील विचार करीत असून, तो मंजूर होण्याची शक्यता आहे.

७३ लाख पेन्शन धारकांच्या खात्यावर निवृत्तीवेतन एकाच वेळी जमा होणार. १३८ ईपीएफओची प्रादेशिक कार्यालयांकडून सध्या पेन्शन. २९ आणि ३० जुलै सीबीटीची बैठक. ८.१% दराने सध्या मिळते खात्यावर व्याज. ८.५% दराने २०१९-२० मध्ये व्याजदर होता. नंतर तो कमी करण्यात आला आहे.

















