Gold Price Review: सोन्याच्या दरात मोठी वाढ, दिवाळीपर्यंत आणखी महाग होऊ शकतं सोनं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 10:34 AM2022-10-05T10:34:21+5:302022-10-05T10:39:26+5:30

Gold Price Review: सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.

Gold Price Review: सराफा बाजारात कामकाजाच्या गेल्या ५ सत्रांमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1800 रुपयांनी महागले आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वाईट बातमी आहे. तज्ज्ञांच्या मते धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.

सोन्याच्या किमती आर्थिक वाढ, महागाई, डॉलर निर्देशांक आणि उच्च रोखे उत्पन्न यावर अवलंबून असतात. सणासुदीचा सोन्याच्या दरावर कोणताही परिणाम होत नाही, असे स्मॉलकेसचे संस्थापक दिवम शर्मा म्हणाले.

दुसरीकडे, एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, "अमेरिकन सिक्युरिटीजच्या उत्पन्नामुळे आणि डॉलरच्या निर्देशांकात सतत घसरण झाल्याने कमोडिटी मार्केटमध्ये (कॉमेक्स) सोन्याचा भाव वाढला.”

आयबीजेएवर दिलेल्या ताज्या दरांनुसार, मंगळवारी सोन्याच्या भावात 899 रुपयांची उसळी पाहायला मिळाली. दुसरीकडे, चांदीचा स्पॉट भाव 3717 रुपयांनी वाढून 61034 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

मंगळवारी सकाळी सोन्याचा भाव 782 रुपयांनी महागला आणि तो 51169 रुपयांवर उघडला, तर चांदी 3827 रुपयांनी महाग होऊन 61144 रुपयांवर उघडली. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या 5 व्यापार सत्रांमध्ये सोने 1801 रुपयांनी महागले असून दर 49368 रुपयांवरून 51169 रुपयांवर पोहोचला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनॅन्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवनीत दमानी यांच्या मते, काही दिवसांपूर्वी फेडची आक्रमक व्याजदराची भूमिका, डॉलरमधील अस्थिरता आणि रोखे उत्पन्नातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या खरेदीत नकारात्मकता आली होती. आता देशांतर्गत आघाडीवर, सर्वसाधारणपणे सण आणि लग्नाच्या काळात सोन्याची मागणी वाढत आहे. सोन्यानंतर चांदीमध्ये 61500-22000 च्या पातळीवर जाण्याची क्षमता आहे.