सोन्याचे दागिने खरेदी करावे की, सोन्याचे बिस्कीट? कोणती गुंतवणूक फायद्याची? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:30 PM2024-01-02T19:30:50+5:302024-01-02T19:47:00+5:30

भारतीयांमध्ये सोन्याचे विशेष आकर्षण आहे. कुणी प्रतिष्ठेसाठी तर कुणी गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करतो.

Gold Jewellery Vs Gold Biscuit: गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक भारतीयाला सोन्याचे विशेष आकर्षण आहे. कुणी आवड म्हणून दागिने खरेदी करतो तर कुणी गुंतवणूक म्हणून सोन्याचे बिस्किट किंवा नाणी खरेदी करतो.

सोन्यामुळे फक्त प्रतिष्ठा वाढवत नाही, तर वाईट काळात आर्थिक मदतही होते. सोन्यावर कर्ज मिळते किंवा ते विकून लगेच पैसे मिळतात. परंतु, बहुतांश लोकांना माहित नसेल की, सोन्याचे दागिने खरेदी करणे तोट्याचा सौदा आहे.

सोन्याच्या दागिन्यांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल, पण हा तोट्याचा सौदा आहे. तुम्ही गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं खरेदी करत असाल, तर दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू नका.

कारण, सोन्याचे दागिने खरेदी करताना किंवा बनवताना मेकिंग चार्जेस भरावे लागतात. परंतु, जेव्हा तुम्ही दागिने विकता किंवा एक्सचेंज करता, तेव्हा मेकिंग चार्जेस वजा केले जातात. म्हणजेच, तेवढे पैसे तुम्हाला मिळत नाहीत.

सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस प्रति ग्रॅम आणि एकूण रकमेच्या आधारावर आकारले जातात. मेकिंग चार्ज 250 रुपये प्रति ग्रॅम आणि एकूण रकमेच्या 10 ते 12 टक्के असू शकतो. तुम्ही 6 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने बनवल्यास तुम्हाला 10 टक्के मेकिंग चार्ज म्हणून 60,000 रुपये द्यावे लागतील.

त्याचबरोबर सोन्याचे दागिने बनवताना सोन्याच्या शुद्धतेसाठी फिल्टर चार्जही घेतला जातो. सोन्याचे दागिने विकून तुम्हाला पूर्ण किंमत मिळत नाही. कारण, दागिने बनवण्यासाठी सोन्याबरोबरच इतर धातूंचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही दागिने विकायला जाता, तेव्हा सोन्याच्या प्रमाणानुसार पैसे दिले जातात.

त्याउलट सोन्याची बिस्किटे विकत घेतल्यास असे होत नाही. सोन्याची बिस्किटे खरेदी केल्यावर फक्त मूळ किंमत द्यावी लागते. सोन्याच्या बिस्किटावर मेकिंग चार्ज किंवा इतर कुठलाही चार्ज आकारला जात नाही.

शिवाय, सोन्याच्या बिस्कीटची शुद्धताही दागिन्यांपेक्षा जास्त असते. हे बिस्कीट पुन्हा विकल्यावर तुम्हाला मूळ किंमत मिळू शकते. त्यामुळे, तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणार असाल, तर दागिन्यांपेक्षा सोन्याचे बिस्किट घेण्याचा विचार करा.