Small Savings Schemes : PPF मध्ये गुंतवणुकीची मर्यादा होईल दुप्पट! टॅक्सही वाचेल आणि व्याजही मिळेल; जाणून घ्या ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:03 PM2021-12-25T19:03:44+5:302021-12-25T19:11:22+5:30

PPF Tax Saving : PPF मधील गुंतवणूक ही E-E-E श्रेणीत येणारी गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी अमाउंट या तिन्हीवरही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हा गुंतवणुकीचा खूप जुना आणि विश्वासार्ह पर्याय आहे. यातून चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय टॅक्स वाचविण्यासाठीही याची मोठी मदत होते.

PPF मधील गुंतवणूक ही E-E-E श्रेणीत येणारी गुंतवणूक आहे. म्हणजेच गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी अमाउंट या तिन्हीवरही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.

PPF मध्ये अशा प्रकारे दुप्पट होते गुंतवणुकीची मर्यादा - PPF मध्ये गुंतवणूक करणारांना केवळ खात्रीशीर परतावाच मिळत नाही, तर आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करातून सूटही मिळते. मात्र अनेक वेळा असेही होते, की पीपीएफ गुंतवणुकीची मर्यादा संपल्यानंतरही गुंतवणूकदाराकडे पैसे शिल्लक राहतात आणि तो गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतो. पण तज्ञांच्या मते, जर गुंतवणूकदार विवाहित असेल तर तो आपल्या पत्नी/पतीच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो आणि त्यात आणखी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, आपण आपल्या जोडिदाराच्या नावाने पीपीएफ खाते उघडल्यास गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होईल, पण, आयकरावरील सवलतीची मर्यादा केवळ 1.5 लाख रुपयांवरच असेल. मात्र, असे असले तरी, याचे इतरही अनेक फायदे आहेत.

PPF मधील गुंतवणुकीवर मिळतात असे फायदे - PPF मधील गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट होऊन ती 3 लाखांवर जाते. E-E-E कॅटॅगिरीत येत असल्याने गुंतवणूकदाराला PPF च्या व्याजावर आणि मॅच्युरिटी अमाउंटवर करातून सूट मिळते

क्लबिंग तरतुदी लागू होत नाही - इनकम टॅक्सच्या सेक्शन 64 नुसार, आपण पत्नीला दिलेल्या कोणत्याही रकमेतून अथवा भेटवस्तूतून मिळणारे उत्पन्न, तुमच्या उत्पन्नात जोडले जाते. मात्र, PPF मधील गुंतवणूक E-E-E मुळे पूर्णपणे करमुक्त आहे, यामुळे क्लबिंग तरतूद याला लागू होत नाही.

लग्न झालेल्या लोकांसाठी ट्रिक - तसेच, आपल्या जोडिदाराचे PPF खाते तयार झाल्यानंतर, आपल्या जोडिदाराच्या PPF खात्यात आपण केलेल्या सुरुवातीच्या गुंतवणुकीपासून आलेले उत्पन्न दरवर्षी आपल्याच उत्पन्नात जोडले जाईल. अर्थात, या पर्यायामुळे विवाहीत लोकांसाठी पीपीएफ खात्यात दुप्पट गुंतवणूक करण्याचा पर्यायही उपलब्ध होईल.

ज्या लोकांची NPS आणि म्यूचुअल फंड सारख्या जोखीम असलेल्या मार्केट लिंक्ड पर्यायांत गुंतवणूक करण्याची इच्छा नाही आणि जे लोक कमी रिस्क घेऊ इच्छितात, अशांसाठी हा एक उत्तम पर्याय असल्याचे सांगितले जाते.

आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, की जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी PPF चा व्याज दर 7.1 परसेंट निश्चित करण्यात आला आहे.