SIP मध्ये गुंतवणूक केल्यास मिळतोय मोफत विमा; पाहा आणखी काय मिळतायत फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 03:42 PM2021-04-27T15:42:36+5:302021-04-27T15:52:37+5:30

काही म्युच्युअल फंड हाऊसनं गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या रणनितीत बदल केले आहेत.

कोरोना महासाथीनं सर्वांना नियमित गुंतवणूकीचं आणि विम्याचे महत्त्व पटवून दिलं आहे. त्याचा परिणामही सर्वांना पाहायला मिळाला आहे.

कोरोना संकटापासून, विमाची मागणी आणि बचत करण्याची इच्छा लोकांमध्ये वाढली आहे. हा बदलता कल पाहता म्युच्युअल फंड हाऊसनं गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं धोरणही बदलले आहे.

म्युच्युअल फंड हाऊस आता नव्या एसआयपी अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करणाऱ्यांना मोफत विमा संरक्षणाचा लाभ देत आहेत.

देशातील काही निवडक म्युच्युअल फंड हाऊसेसनं एसआयपीमार्फत मोफत विमा संरक्षणाचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे.

ज्या एसआयपीमध्ये विमा संरक्षण देखील देण्यात येत आहे. यामध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, म्युच्युअल फंड एसआयपी प्लस, निपॉन इंडिया म्युच्युअल फंड, एसआयपी इन्शुरन्स आणि आदित्य बिर्ला सनलाईफ सेन्च्युरी एसआयपी यांचा समावेश आहे.

म्हणजेच जर गुंतवणूकदारांनी या एसआयपी योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरू केले तर वैद्यकीय तपासणीशिवाय त्यांना विम्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

विमा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एसआयपीद्वारे विम्याचा फायदा घेण्याच्या अनेक गुंतागुंत आहेत, ज्यास गुंतवणूकदारास प्रथम समजून घेतलं पाहिजे.

एसआयपीने दिलेला विमा संरक्षण हा ग्रुप टर्म इन्शुरन्स आहे. हे एसआयपी बरोबर एकत्र करण्यात आलं आहे.

एसआयपीच्या सहाय्याने गुंतवणूकदार या टर्म कव्हरचा लाभ घेऊ शकतात. फंड हाऊस १८ ते ५१ वर्षे वयोगटातील गुंतवणूकदारांना मुदतीचा विमा लाभ देत आहेत.

या अंतर्गत वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत कव्हर देण्यात येत आहे.

सध्या निवडक म्युच्युअल फंड हाऊसेस पहिल्या वर्षात एसआयपीच्या रकमेपेक्षा १० पट अधिक विमा संरक्षण देतात.

दुसऱ्या वर्षात गुंतवणूकीच्या रकमेच्या ५० पट आणि तिसर्‍या वर्षी १०० पट अधिक कव्हर देत आहे. त्याचबरोबर निप्पॉन इंडिया एसआयपीच्या रकमेच्या १२० पट कव्हर देत आहे.

जर तुम्ही एसआयपी योजनेत दरमहा १००० रुपये इन्शुरन्स कव्हरसह गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला पहिल्या वर्षी १०,००० रुपये, दुसर्‍या वर्षी ५० हजार रुपयांचे कव्हर आणि तिसर्‍या वर्षी १ लाख रुपयांचे कव्हर मिळेल.

म्हणजेच जर एसआयपी सुरू केलेल्या व्यक्तीचा तिसर्‍या वर्षासाठी काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला म्युच्युअल फंडाच्या युनिट्ससह एक लाख रुपये मिळतील.

तथापि फंड हाऊस केवळ नवीन गुंतवणूकदारांना हा फायदा देत आहेत. हा फायदा घेण्यासाठी जुन्या गुंतवणूकदारांना नवीन एसआयपी सुरू करावी लागेल.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसआयपीद्वारे विमा संरक्षण मिळविले असेल तर त्याला किमान तीन वर्षे नियमित गुंतवणूक करावी लागेल.

तीन वर्षापूर्वी एसआयपी संपुष्टात आणल्यास मुदतीच्या विम्याचा लाभ समाप्त होईल.

त्याच बरोबर तीन वर्ष एसआयपी चालवल्यानंतरही त्याला मुदतीच्या विम्याचा लाभ मिळत राहील. तथापि, जेव्हा गुंतवणूक थांबली जाईल तेव्हा संरक्षणाची रक्कम कमी होईल.

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एसआयपी सोबत फ्री टर्म इन्शुरन्स कव्हरचा पर्याय वाईट नाही. उदाहरणासाठी जर तुम्ही ५० लाख रूपयांचा टर्म इन्शुरन्स घेतला आणि तुमचं वय ३० वर्ष आहे, तर तुम्हाला ४ हजार रूपयांपासून १०,५०० रूपयांपर्यंतचं प्रिमिअम भरावं लागेल.

फंड हाऊस तुमची रक्कम कुठे गुंतवतंय हे तुम्हाला पाहावं लागे. तसंच त्याची कामगिरी कशी आहे हेदेखील तपासावं लागेल. सर्व बाबींची पडताळणी करूनच तुम्हाला गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा लागेल.