25 वर्षांचा झाला भारतातील मोबाईल, या दोन नेत्यांमध्ये झालं होतं पहिलं संभाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:59 PM2020-07-31T18:59:44+5:302020-07-31T19:05:33+5:30

मोबाईल आज प्रत्येकाची गरज बनली आहे, भारतात कित्येकांच्या रोजागाराचं साधनही मोबाईल बनलंय. पण, भारतातील मोबाईलचा हा प्रवास 25 वर्षे जुना आहे. 31 जुलै 1995 मध्ये भारतात पहिल्यांदा मोबाईल आला होता.

आजच्याच दिवशी 25 वर्षांपूर्वी भारतातील दोन राजकीय नेत्यांमध्ये पहिलं मोबाईल संभाषण झालं होतं.

भारताचे तत्कालीन दूरसंचारमंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी एकमेकांशी संवाद साधला होता. कधीकाळी स्वप्नवत वाटणारा मोबाईल आज आपली गरज बनला आहे.

लॉकडाऊन काळात तर मोबाईल हेच सर्वांच्या संचार आणि संवादाचं प्रमुख माध्यम बनलंय. विशेष म्हणजे कोरोनामुळे वृत्तपत्रेही बंद होती, पण डिजिटल क्रांतीमुळे मोबाईलच्या माध्यमातूनच हे वृत्तपत्र लोकांपर्यंत पोहोचले.

सुरुवातीच्या काळात मोबाईलच्या आठवणी सांगताना अनेकजण मोबाईलच्या इनकमिंग बिलासंदर्भातही भाष्य करतात. मी तेव्हापासून मोबाईल वापरत असल्याचंही ते सांगतात.

देशात जेंव्हा सर्वप्रथम मोबाईल आला, तेव्हा मोबाईलचा वापर आणि संवाद हा खर्चिक होता. त्यामुळे, केवळ मोठ्या राजकीय व्यक्ती, उद्योगपती आणि गर्भश्रीमंतांकडेच मोबाईल होता.

ज्योती बसू यांनी कोलकाताच्या रायटर्स बिल्डिंगमधून पहिला कॉल नवी दिल्लीतील दूरसंचार भवनमध्ये केला होता. मोगी ट्रेल्सट्रा ही भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटींग कंपनी होती. याच नेववर्कवरुन पहिला मोबाईल कॉल करण्यात आला होता.

मोदी ट्रेल्स्ट्रा ही कंपनी म्हणजे भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेलिकॉम कंपनीचं जॉईंट वेंचर होतं. त्यावेळी देशात केवळ 8 कंपन्यांना सेल्युलर सर्व्हीस प्रोव्हायरची परवानगी मिळाली होती.

मोबाईलच्या 25 वर्षे जुन्या काळात गेल्यानंतर, आज मोबाईलमध्ये मोठी क्रांती झाली आहे. सध्या मोबाईल नेटवर्कमध्येही या जुन्या कंपन्यांचं नाव ऐकायला मिळत नाही. दूरसंचार क्षेत्रातील वाढलेल्या स्पर्धेमुळेच मोबाईल क्रांती झाली आहे.

एकेकाळी शाळेत किंवा महाविद्यालयात मोबाईल नेण्यास परवानगी नसे, मात्र, लॉकडाऊनमुळे आज हाच मोबाईल घरातून शाळा चालवतोय.

भारतातील मोबाईलची सुरुवात ज्योती बसू आणि नवी दिल्लीतील दूरसंचार भवनपासून झाली. मात्र, आज गाव-खेड्यात मोबाईलचं जाळ पोहोचलंय.

तुम्हाला आठवतंय का, तुम्ही घेतलेला पहिला मोबाईल आणि त्या मोबाईलचं नेटवर्क. तुमच्या पहिल्या मोबाईलची आठवण कमेंट करुन आम्हाला सांगा.