रोज ८,२८,६३,३५० रुपये खर्च केले तरी ६७३ वर्ष आरामात बसून खाऊ शकतो हा अब्जाधीश, किती आहे नेटवर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 08:26 AM2024-01-16T08:26:15+5:302024-01-16T08:34:04+5:30

अलिकडच्या वर्षांत जगातील अव्वल पाच श्रीमंतांच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अलिकडच्या वर्षांत जगातील अव्वल पाच श्रीमंतांच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली आहे. इलॉन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्ट, जेफ बेझोस, लॅरी एलिसन आणि वॉरेन बफे यांची नेट वर्थ २०२० पासून दुप्पट झाली आहे. ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार, या अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ८६९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

गेल्या चार वर्षांत या श्रीमंतांच्या संपत्तीत दर तासाला १.४ कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. हा ट्रेंड असाच चालू राहिला तर जगाला एका दशकात पहिले ट्रिलियनियर मिळू शकतात. दुसरीकडे, गेल्या चार वर्षांत जगातील सुमारे पाच अब्ज लोक गरीब झाले आहेत. महागाई, युद्ध आणि हवामान बदलांच्या संकटामुळे या लोकांची अवस्था बिकट झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जगातून गरिबी दूर होण्यास सुमारे २३० वर्षे लागतील.

रिपोर्टनुसार, २०२० च्या तुलनेत जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ३.३ ट्रिलियन डॉलर्स किंवा सुमारे ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती नोव्हेंबरच्या अखेरीस २४५.५ अब्ज डॉलर्स होती, जी मार्च २०२० च्या तुलनेत ७३७ टक्क्यांनी अधिक आहे. त्याचप्रमाणे, बर्नार्ड अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती या कालावधीत १११ टक्क्यांनी वाढून १९१.३ अब्जावर पोहोचली आहे.

Amazon च्या संस्थापकाची एकूण संपत्ती २४ टक्क्यांनी वाढून १६७.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांची नेट वर्थ १०७ टक्क्यांनी वाढून १४५.५ बिलियन डॉलर्स झाली आहे.

बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांची नेट वर्थ ४८ टक्क्यांनी वाढून ११९.२ बिलियन डॉलर्स झाली आहे. या अब्जाधीशांची संपत्ती महागाई दराच्या तुलनेत तिप्पट वेगाने वाढली.

ऑक्सफॅमचं म्हणणं आहे की जगातील अव्वल पाच अब्जाधीशांनी दररोज १० लाख डॉलर्स खर्च केले तर ते ४७६ वर्षे बसून जेवू शकतात. यानुसार, मस्क यांना त्यांची संपूर्ण संपत्ती खर्च करण्यासाठी ६७३ वर्षे लागतील, तर बेझोस यांना ४५९ वर्षे दररोज १० लाख डॉलर्स खर्च करावे लागतील.

रिपोर्टनुसार, जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक टक्का लोकांकडे एकूण जागतिक आर्थिक संपत्तीपैकी ४३ टक्के हिस्सा आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमपूर्वी ऑक्सफॅमनं आपला अहवाल प्रसिद्ध केला.