आता यूपीआय पेमेंटशी जोडता येणार क्रेडिट कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 11:04 AM2022-06-09T11:04:13+5:302022-06-09T11:10:02+5:30

UPI payments : क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश दिले जाणार आहेत.

नवी दिल्ली : क्रेडिट कार्डाची यूपीआयशी जोडणी करण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने बुधवारी केली. त्यामुळे क्रेडिट कार्डाद्वारेही यूपीआय पेमेंट केले जाऊ शकणार आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रुपे क्रेडिट कार्डालाच ही सुविधा दिली जाईल. सध्या यूपीआय वापरकर्त्यांना केवळ डेबिट कार्ड आणि बचत तथा करंट खात्यांवरच वित्तीय व्यवहार करण्याची सुविधा मिळते. क्रेडिट कार्डांना यूपीआयशी जोडण्यासाठी एनपीसीआयला योग्य निर्देश दिले जाणार आहेत.

१ जानेवारी २०२० रोजी यूपीआय आणि रुपे यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या वित्तीय व्यवहारांवरील मर्चंट डिस्काउंट दर शून्य करण्यात आला होता. म्हणजेच या व्यवहारांवर शुल्क लावले जात नाही. त्यामुळे संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यूपीआय स्वीकारले आहे.

क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार की नाही, याबाबत रिझर्व्ह बँकेने कोणताही खुलासा केलेला नाही. सध्याच्या क्रेडिट कार्ड व्यवहारांवर २ ते ३ टक्के शुल्क (एमडीआर) लागते. यूपीआयची सुविधा मिळाल्यानंतर हे शुल्क हटणार की सुरूच राहणार हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, मागील २ वर्षांत यूपीआयची स्वीकारार्हता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका वृत्तानुसार, यूपीआयकडे सध्या २६ कोटी युनिक युजर्स आहेत. तसेच ५ कोटी व्यापारी प्लॅटफॉर्मवर आहेत.

मे २०२२ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून १०.४० लाख कोटी रुपयांचे ५९४.६३ कोटी व्यवहार प्रोसेस करण्यात आले. एप्रिलमध्ये हा आकडा ५५८ कोटी होता. एका महिन्यात यूपीआयचे व्यवहार मूल्य प्रथमच १० लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे.