SBI सह 'या' बँकांनी बंद केली लाखो ग्राहकांची खाती; जाणून घ्या, यात तुमचेही खाते आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:02 PM2021-08-02T15:02:01+5:302021-08-02T15:11:58+5:30

SBI : SBI ने जवळपास 60,000 ग्राहकांची अकाउंट खाती बंद केली आहेत, असे समजते.

नवी दिल्ली : बँकेत ज्यांचे खाते आहे, त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. जर तुमचे सुद्धा सरकारी बँक SBI (State Bank of India) किंवा इतर खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये (Governmnet Bank) खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

बँकेने लाखो चालू खाती बंद केली आहेत, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. SBI ने जवळपास 60,000 ग्राहकांची अकाउंट खाती बंद केली आहेत, असे समजते.

दरम्यान, बँकेने ही खाती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) निर्देशानुसार बंद केली आहेत. इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, चालू खाते बंद केल्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना अडचणी येत आहेत.

आपल्या माहितीसाठी, जर ग्राहकाने इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर बँक या ग्राहकांचे चालू खाते उघडू शकत नाही.

आरबीआयच्या या नियमाचा उद्देश रोख प्रवाहावर लक्ष ठेवणे आणि निधीच्या गैरव्यवहारावर आळा घालणे आहे. आरबीआयने म्हटले आहे की, नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, अनेक कर्जदार अनेक बँकांमध्ये चालू खाती उघडून निधीचा गैरवापर करत होते, यामुळे बँकेने या सर्व ग्राहकांची खाती बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आरबीआयच्या नवीन नियमांमुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारी बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीला सांगितले की, हजारो खाती बंद करण्यास भाग पाडण्यात आले आहे. जर सर्व बँकांबद्दल सांगायचे झाले तर ही संख्या लाखांमध्ये असू शकते.

बँकेने ग्राहकांना ईमेल आणि मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली आहे. SBIने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आरबीआयने जारी केलेल्या निर्देशानुसार तुमचे चालू खाते बंद केले जात आहे.

तुम्ही आमच्या शाखेत रोख, क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता. तुम्हाला विनंती आहे की, तुमचे चालू खाते 30 दिवसांच्या आत बंद करण्याची व्यवस्था करा, असे SBIने म्हटले आहे.

SBI ने 60,000 पेक्षा जास्त खाती बंद केली आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी तयार केलेल्या नियमानुसार, कर्जदाराचे चालू खाते फक्त त्या बँकेत असू शकते, ज्यात त्याच्या एकूण कर्जांच्या किमान 10 टक्के रक्कम असेल.