बालकांची अनोखी बँक; 17 हजार मुलांचे 16 कोटी रुपये जमा, 6% व्याजही दिले जाते, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 06:45 PM2023-08-24T18:45:56+5:302023-08-24T18:52:01+5:30

Balgopal Bachat Bank Idar Sabarkantha: मुलांना लहानपणापासून बचतीचे धडे देणे आणि त्यांच्या उच्चशिक्षणासाठी पैशांची सोय करणे, हा या बँकेचा उद्देश आहे.

Balgopal Bachat Bank Idar Sabarkantha: गुजरातच्या साबरकंठाजवळील इडरमध्ये 2009 पासून 'बाल गोपाल बचत बँक' सुरू आहे. 18 वर्षांखालील प्रत्येक बालकाला(मुलगा, मुलगी) या सहकारी बँकेत खातं उघडण्याची परवानगी आहे.

तो दरमहा त्याच्याकडील पैसेही या बँकेत जमा करू शकतो. या बाल बचत बँकेत मुलांनी जमा केलेल्या पैशांवर 6 टक्के व्याजही दिले जाते. विशेष म्हणजे, आतापर्यंत 17 हजारांहून अधिक मुलांनी या बँकेत 16 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे.

ही बाल बचत बँक सहकारी तत्त्वावर चालविली जाते. याची स्थापना 14 वर्षांपूर्वी 2009 मध्ये ईडरचे माजी तालुका पंचायत अध्यक्ष अश्विनभाई पटेल यांनी केली होती. आजही ते या बँकेचे अध्यक्ष आहेत. ही बाल बचत बँक 14 वर्षांपासून मुलांच्या सेवेत आहे.

खातं उघडणाऱ्या मुलाला एक बॉक्स दिला जातो, ज्यामध्ये ते दरमहा बचत केलेले पैसे ठेवू शकतात. दर महिन्याच्या एका ठराविक दिवशी बालबचत बँकेचा एक कर्मचारी त्या मुलांच्या घरी जातो आणि जमा झालेले पैसे बँकेत जमा करुन ग्राहकाला पावतीही देतो.

2009 पासून 325 गावांतील 17 हजारांहून अधिक मुलांनी या बँकेत खाती उघडली आहेत. यापैकी 5000 हून अधिक सदस्य (ग्राहक) 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. बँकेने वेळोवेळीउच्च शिक्षणासाठी व्याजासह रक्कम मुलांना परत केली आहे. यादरम्यान कोणत्याही सदस्याला पैशांची गरज असल्यास ते खात्यातून पैसेही काढू शकतात.

अध्यक्ष अश्विनभाई पटेल यांनी सांगितले की, प्रत्येक सदस्याने सरासरी एक लाख रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. यामध्ये सर्वाधिक बचत केतुल पटेल नावाच्या सदस्याची आहे, ज्याने या बँकेत 4 लाख रुपयांहून अधिक बचत केली आहे. व्याजदराच्या बाबतीत त्यांना आतापर्यंत सर्वाधिक फायदा झाला आहे.

अश्विनभाई पटेल म्हणाले की, या बालबचत बँकेचा मुख्य उद्देश मुलांना लहानपणापासूनच बचतीची सवय लावून त्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणे हा आहे. येथे वाचवलेला पैसा मुलांना उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसाय उभारणीसारख्या इतर कामांसाठी वापरता येईल.

मुले पैसे कसे वाचवतात याविषयी अश्विनभाई पटेल म्हणाले की, बहुतांश मुलांना त्यांच्या पालकांकडून दर महिन्याला काही रुपये पॉकेटमनी म्हणून दिले जातात. याशिवाय घरी आलेले नातेवाईकही मुलांना 10, 20 किंवा 50 रुपये देतात. काही मुले सुटीच्या दिवसात कामे करून पैसे कमावतात. हे सर्व पैसे मुलांच्या बचत बँकेत जमा आहेत.