Anupam Mittal : शुभमंगल सावधान! लग्न जुळवून 'त्याने' उभारली 2500 कोटींची कंपनी; 72 शहरात 123 सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:31 AM2024-02-19T11:31:32+5:302024-02-19T11:44:38+5:30

Anupam Mittal : अनुपम मित्तल असं व्यक्तीचं नाव असून ते Shaadi.com चे संस्थापक आहेत. शार्क टँक इंडियामध्ये ते जज म्हणून देखील पाहायला मिळतात.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. चक्क लोकांचं लग्न जुळवून देऊन एका व्यक्तीने तब्बल 2500 कोटींची कंपनी उभी केली. इतकच नाही तर देशातील 72 शहरात त्यांचे 123 सेंटर आहेत.

अनुपम मित्तल असं व्यक्तीचं नाव असून ते Shaadi.com चे संस्थापक आहेत. शार्क टँक इंडियामध्ये ते जज म्हणून देखील पाहायला मिळतात. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवावेत आणि मार्गदर्शन करावं असं वाटतं.

Shaadi.com वर दावा करण्यात आला आहे की, आतापर्यंत 5 कोटी लोकांची नाती त्यांनी जोडली आहे. त्यांच्या या प्रवासाबाबत जाणून घेऊया. मुंबईत जन्मलेल्या अनुपम मित्तल यांनी सुरुवातीचे शिक्षण जय हिंद कॉलेजमधून केलं.

अमेरिकेच्या बोस्टन कॉलेजमधून ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये एमबीए केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतच प्रॉडक्ट मॅनेजरची नोकरी स्वीकारली. ही नोकरी फार काळ टिकली नाही आणि ते अमेरिका सोडून भारतात आला.

भारतात परतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या ऑफिसमध्ये वेब डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं. यावेळी अनुपम 25 वर्षांचे होते. लोकांना चॉईस देण्यासाठी त्यांनी 1996 मध्ये Sagaai.com नावाची वेबसाइट सुरू केली. त्यांचा हा एकमेव उद्देश होता जिथे लोक वधू आणि वर शोधू शकतील.

अनुपम मित्तल यांना पुढे असं वाटलं की Saagai.com हे नाव विवाहासाठी योग्य नाही. अमेरिकेतील नोकरी सोडल्यावर त्यांनी आपल्या पोर्टलचं नाव बदलून शादी डॉट कॉम केलं. लग्नासाठी वधू-वर शोधण्यासाठी स्वतंत्र पोर्टल असण्याची ही पहिलीच वेळ होती.

2001 मध्येही भारतात इंटरनेट युजर्स खूपच कमी होते. त्यानंतर मित्तल यांनी ऑफलाइन सेंटर सुरू केलं. 2004 मध्ये उघडलेल्या या सेंटरमध्ये वैवाहिक सेवा पुरविल्या जात होत्या. या केंद्राला ‘शादी सेंटर’ असं नाव देण्यात आले.

हळूहळू इंटरनेट युजर्स वाढू लागले आणि Shaadi.com एक ब्रँड म्हणून उदयास येऊ लागला, कारण लोकांना पर्सनलाइज्ड सेवा आवडत होत्या. 2008 मध्ये, या पोर्टलचे 1 कोटी युजर्स होते आणि 10 लाख लोकांनी लग्न केलं होतं. यावेळेपर्यंत, ते देशातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय पोर्टल बनलं होतं.

2011 पर्यंत, Shaadi.com च्या युजर्सची संख्या 2 कोटींवर पोहोचली होती. हे पोर्टल वाढतच गेले आणि त्याचप्रमाणे ऑफलाइन सेंटरही वाढले. 2015 पर्यंत भारतात 70 ठिकाणी 100 शाही सेंटर उघडले होते. तोपर्यंत स्पर्धकही वाढले होते.

भारत मेट्रोमनी आणि जीवनसाथी डॉट कॉम यांनीही सुरुवात केली होती, जे अनुपम मित्तल यांच्यासाठी एक नवीन आव्हान होतं. भारतीय समाजात लग्नाला खूप महत्त्व आहे, पण इंटरनेटच्या प्रसारामुळे तरुण पिढीसाठी डेटिंगचा पर्यायही खुला झाला आहे. मित्तल यांनी गरज समजून 2016 मध्ये थ्रिल ग्रुपमधील 25 टक्के हिस्सा विकत घेतला.

2019 पर्यंत जिओने इंटरनेटचं जग बदलून टाकलं होतं. या वर्षी Shaadi.com ने 15 लाख युजर्स जोडले. एकाच दिवसात 12,000 हून अधिक साइनअप झाले. त्यानंतर या पोर्टलने बाजारपेठेत 40 टक्के हिस्सा मिळवला. आजही Shaadi.com ही लग्न करणाऱ्या लोकांची पहिली पसंती आहे.

27 वर्षांच्या या प्रवासात भारतातील 72 शहरांमध्ये 123 शादी सेंटर स्थापन झाली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मित्तल 185 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांची पच्नी आंचल कुमार आणि मुलगी एलेसा यांच्यासह ते मुंबईमध्ये राहतात.