TATA च्या हाती Air India येताच बँकांमध्येच लागली स्पर्धा; कर्ज देण्यासाठी पुढे सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:47 AM2021-12-30T10:47:15+5:302021-12-30T10:53:44+5:30

Air India Bank Loans : जुन्या कर्जांच्या तुलनेत राहणार फारच कमी व्याजदर. काही बँकांनी एअर इंडियाला कर्ज देण्यासाठी घेतला पुढाकार.

एअर इंडियाचा (Air India) लिलाव हा या वर्षातील सर्वात मोठ्या व्यावसायिक डील्सपैकी एक आहे. एअर इंडिया महिनाभरात टाटा समूहाच्या (TATA Group) ताब्यात येईल. त्याचा परिणाम आता बँकिंग कर्जावरही दिसून येत आहे.

एअर इंडियाच्या विद्यमान कर्जदारांनी आता टाटाशी संबंधित कंपनीला ३५,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. जी कंपनी आता एअर इंडियावर नियंत्रण ठेवणार आहे, त्या कंपनीला या बँकांनी कर्ज ऑफर केलं आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत अहवालात असे सांगण्यात आलंय की, एअर इंडियाला कर्ज देणाऱ्या बँकांनी टाटा सन्सशी संबंधित टॅलेसला (Talace) ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. हे कर्ज देखील फक्त ४.४५ टक्के वेटेड एव्हरेज यील्डवर देण्याची ऑफर देण्यात आलीये.

खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एअर इंडिया ही कंपनी टॅलेसच्या अधिपत्याखाली येईल. टाटा सन्स ही टॅलेसची प्रमोटर आहे. टॅलेसने एअर इंडियाला कर्ज देणाऱ्या बँकांना सर्वसाधारण कारणासाठी २३ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी एका वर्षासाठी बोली लावण्यास सांगितले होते.

या बोलीच्या निमंत्रणानंतर बँकांनी कंपनीला ही ऑफर सादर केली आहे. एअर इंडियाच्या कर्जासाठी १८,००० कोटी रुपये आणि प्रारंभिक परिचालन खर्चासाठी ५ हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे कंपनीनं यापूर्वी सांगितलं होतं.

बँकांची ही ऑफर टाटा समूहाबद्दलची विश्वासार्हता दर्शवते. एअर इंडिया आर्थिक अडचणीत होती आणि त्यामुळे सरकारला त्याचं खाजगीकरण करावं लागलं. आता टाटांच्या हाती एअर इंडिया जाताच बँकांनी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.

ईटीच्या अहवालानुसार, संबंधित बँकांनी टाटा समूहाच्या कंपनीला कोणतेही तारण न ठेवता विनारेटेड कर्ज देण्याचा विशेष ठराव पास केला. MCLR पेक्षा कमी व्याजावर कर्ज देण्यासाठी असा ठराव आवश्यक आहे.

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की ज्या बँकांनी टाटाच्या कंपनीला स्वस्त कर्ज देण्याची ऑफर दिली आहे त्यात एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

या बँकांनी ३ हजार कोटी रुपयांपासून १२ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज ऑफर केलं आहे. विशेष म्हणजे हा अहवाल खरा ठरल्यास टाटांना एअर इंडियाचे जुने कर्ज फेडण्यासाठी जे नवीन कर्ज मिळणार आहे, त्याचा व्याजदर पूर्वीपेक्षा खूपच कमी असेल.

यावर्षी झालेल्या लिलावात टाटा समूहाच्या टॅलेसने १८ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, जी सर्वात मोठी बोली ठरली. या १८,००० कोटी रुपयांपैकी १५,३०० कोटी रुपये एअर इंडियाच्या जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, तर २,७०० कोटी रुपये सरकारला रोख स्वरूपात द्यायचे आहेत.

एअर इंडियाच्या जुन्या कर्जावर बँका ९ ते १० टक्के व्याज आकारत आहेत. मात्र, आतापर्यंत कोणत्याही बँकेने किंवा टाटा समूहाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सध्या एअरलाईन्सची धरा टाटा समुहाकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात समोर आलेल्या एका वृत्तानुसार अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो.