अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मूल्यांकनात विक्रमी वाढ, पतंजलीला मोठा झटका; अशी आहे रिलायन्सची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 09:34 PM2022-06-15T21:34:58+5:302022-06-15T21:45:37+5:30

योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे मूल्यांकन घसरले आहे. बरगंडी प्रायव्हेट हुरून इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

शेअर बाजारातील तेजीसह मूल्यांकनाचा विचार करता, अदानी समूहाच्या कंपन्यांना सर्वाधिक नफा झाला असून, मुकेश अंबानींची रिलायन्स दुसऱ्या स्थानावर आहे. तर योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे मूल्यांकन घसरले आहे. बरगंडी प्रायव्हेट हुरून इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अदानी समूहाला किती नफा झाला? - गेल्या सहा महिन्यांत, म्हणजेच नोव्हेंबरपासून एप्रिल, 2022 पर्यंत, समूहाचे मुल्यांकन 88.1 टक्क्याने वाढून 17.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. अहवालानुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांत अदानी ग्रीन एनर्जीचे मूल्यांकन सर्वात वेगाने 139 टक्क्यांनी वाढून 4.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याच बरोबर, कंपनी सहाव्या स्थावर आली आहे. सहा महिन्यांपूर्वी ही कंपनी 16व्या स्थानावर होती.

याच कालावधीत अदानी विल्मर जवळपास 190 टक्क्यांनी वाढून 66,427 कोटी रुपये, अदानी पावर 157.8 टक्यांनी वाढून 66,185 कोटी रुपयांवर पोहोचली.

अदानी समूहाच्या एकूण 9 कंपन्यांचे मूल्यांकन गेल्या सहा महिन्यांत (नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022) 88.1 टक्क्यांनी वाढून 17.6 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. टॉप 500 कंपन्यांमध्ये यांची हिस्सेदारी 7.6 टक्के एवढी आहे.

मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानावर - दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य 13.4 टक्क्यांनी वाढून 18.87 लाख कोटी रुपये झाले. तर, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यादीत, 12.97 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह तिसऱ्या स्थानावर आहे. खरे तर या काळात तिचे मूल्यांकन 0.9 टक्क्यांनी घसरले आहे. यानंतर, अनुक्रमे, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकाचा क्रमांक लागतो.

रामदेव बाबांच्या कंपनीचे मूल्यांकन घसरले - ज्या कंपन्यांच्या मूल्यांकनात घसरण दिसून आली आणि रँकिंगमध्येही घट दिसून आली, त्यांत बाबा रामदेवांच्या पतंजली आयुर्वेदचाही समावेश आहे. या कंपनीच्या मुल्यांकना 17.9 टक्क्यांची घसरण होऊन, ते 23,000 कोटी रुपयेच राहिले आहे.

याच बरोबर पतंजलीच्या रँकिंगमध्येही घसरण होऊन, ती 184व्या स्थानावर आली आहे. यापूर्वी ही कंपनी 34व्या स्थानावर होती.