न भूतो! ६.४० लाख कोटी, ४७० विमान अन् ४ देश, Air India ची ऐतिहासिक डील; TATA ने कमालच केली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 03:08 PM2023-02-15T15:08:25+5:302023-02-15T15:18:14+5:30

टाटाच्या या ऐतिहासिक डीलमधील एअर इंडियासाठीचे पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होणार आहे.

Air Indiaची TATA मध्ये घरवापसी झाल्यापासून टाटा समूहाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एअर इंडियाला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी टाटा कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे. अशातच टाटाने एअर इंडियासाठी न भूतो असा करार केला असून, खुद्द पंतप्रधान मोदींनीही या करारासाठी टाटाचे अभिनंदन केले आहे.

एअर इंडियाने विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा करार केला आहे. TATA सन्स या एअर इंडियाची मालकी असलेल्या कंपनीने म्हटले आहे की, एअरलाइन सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, नेटवर्क आणि मानव संसाधनांच्या दिशेने मोठ्या परिवर्तनावर भर दिला जात आहे. टाटा समूह कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन अत्याधुनिक बोईंग आणि एअरबस विमाने खरेदी करणार आहे.

TATA समूहाची एअर इंडियाने फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून २५० विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये ४० वाइड बॉडी ए-३५० विमाने आणि २१० नॅरो बॉडी विमानांचा समावेश आहे. ऑर्डर वाढवण्याचा पर्यायही करारात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

टाटा समूह एकूण ४७० विमाने खरेदी करणार आहे. टाटाने विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अमेरिकेची बोइंग आणि युरोपची एअरबस यांच्याशी हा करार केला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या करारासाठी भारताचे अभिनंदन केले आहे, यावरून या कराराचे महत्त्व समजू शकते.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, एअर इंडिया, एअरबस आणि रोल्स-रॉयस यांच्यातील ऐतिहासिक करार यूकेच्या भरभराटीच्या एरोस्पेस क्षेत्रासाठी अमर्याद वाढ असल्याचे दर्शविते. ते म्हणाले की या करारामुळे डर्बी ते वेल्सपर्यंत उत्पादन क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि नवीन संधी निर्माण होतील. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा करार ८० अब्ज डॉलर्स म्हणजेच ६.४० लाख कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एअर इंडिया-एअरबस भागीदारीच्या लॉन्चिंगला हजेरी लावली. टाटा आणि एअरबसच्या भागिदारी करारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या ऐतिहासिक करारासाठी मी एअर इंडिया-एअरबसचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी आमच्यात सामील झाल्याबद्दल आमचे मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानू इच्छितो. हा महत्त्वाचा करार भारत आणि फ्रान्समधील सखोल संबंध तसेच भारताच्या नागरी उड्डाण क्षेत्रातील यशाचे प्रतिबिंब आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणार्‍या उडान योजनेद्वारे आम्ही देशाच्या दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहोत. भारताच्या मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड व्हिजन अंतर्गत एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक नवीन संधी पुढे येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला पुढील १५ वर्षांत २००० हून अधिक विमानांची आवश्यकता असेल. भारत या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी देखभाल आणि दुरुस्ती केंद्र बनू शकतो.

या करारावरून हे दिसून येते की एअरबस आणि सर्व फ्रान्स भागीदार भारतासोबत भागीदारी वाढवण्यासाठी काम करत आहेत. भारतासोबत आपण खूप काही साध्य केले आहे. हे भागिदारी पुढे नेण्याची ऐतिहासिक संधी आपल्याकडे आहे.

तसेच महामारी संपल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये अधिक देवाणघेवाण व्हायला हवी. फ्रान्समध्ये विद्यार्थी, शास्त्रज्ञ, कलाकार, व्यापारी, महिला, पर्यटक यांचे स्वागत आहे. मी सर्वांना भारत-फ्रान्स मैत्रीचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करतो. असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यएल मॅक्रॉन यांनी म्हटले.

टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मंगळवारी सांगितले की, ते एअरबस आणि बोइंगकडून एकूण ४७० वाइड बॉडी आणि नॅरो बॉडी विमाने खरेदी करणार आहेत. यात ४० एअरबस ए ३५० एस, २० बोइंग ७८७ आणि १० बोइंग ७७७-९ एस वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे.

तसेच, २१० एअरबस ए ३२०/ ३२१ निओस आणि १९० बोइंग ७३७ मॅक्स यांचा समावेश आहे. नवीन विमानांपैकी पहिले विमान २०२३ च्या उत्तरार्धात सेवेत दाखल होईल आणि बहुतेक विमाने २०२५ च्या मध्यापासून येणार आहेत.