Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीला तुम्ही राशीप्रमाणे करा दान; तुमच्या भाग्याचा पतंग घेईल भरारी, होईल भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:07 PM2022-01-13T19:07:17+5:302022-01-13T19:15:04+5:30

Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीला दान केल्यास सुख समृद्धी, भरभराट आणि धनप्राप्ती होते, असे सांगितले जाते.

पौष महिन्यातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या राशी संक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. संपूर्ण देशभरात मकरसंक्रातीच्या सणाला वेगळे महत्त्व आहे. मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. सन २०२२ मध्ये १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती आहे.

मकरसंक्रांतीचा सण माघ शुद्ध सप्तमीपर्यंत साजरा केला जातो. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून या काळाला उत्तरायण असेही म्हणतात. संक्रांतीचा काळ थंडीचा असल्यामुळे गोरगरीबांना अन्न, वस्त्र दान करणे उचित ठरते. नात्यांमधील वितुष्ट दूर करण्यासाठी तिळगुळाचे वाण देऊन हितशत्रूंपासूनही मुक्तता करता येते.

मकरसंक्रातीच्या दिवशी गंगास्नान, दान, पुण्यकर्म यांचे विशेष महत्व आहे. या दिवशी केले जाणारे दान फलदायी ठरते. मकरसंक्रांतीला दान केल्यास सुख समृद्धी, भरभराट आणि धन प्राप्ती होते, असे सांगितले जाते. या दिवशी वस्त्र, तूप, खिचडी, चादर, तीळ, गूळ यांचे दान केले जाते. मात्र, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय दान करावे, जाणून घेऊया...

मकरसंक्रांतीला मेष राशीच्या व्यक्तींनी पाण्यात पिवळे फुल , हळद, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच तीळ गुळाचे दान द्यावे. तसेच या दिवशी गूळ, शेंगदाणे आणि तीळ यांचे दान करावे. तुम्ही कपडे देखील दान करू शकता.

मकरसंक्रांतीला वृषभ राशीच्या व्यक्तींनी पाण्यात चंदन, दूध, पांढरे फुल , तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच पांढरे वस्त्र, दही आणि तीळ दान करावे. असे केल्याने त्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदेल, असे सांगितले जाते.

मकरसंक्रांतीला मिथुन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केवळ तीळ टाकून सूर्याची बारा नावे घेत अर्घ्य द्यावे. तसेच मूग डाळ, तांदूळ आणि घोंगडी दान करावी. याशिवाय तुम्ही चादर आणि छत्र्याही दान करू शकता.

मकरसंक्रांतीला कर्क राशीच्या व्यक्तींनी पाण्यात दूध, तांदूळ, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. संकटातून मुक्ती मिळू शकेल. तसेच तांदूळ, चांदी आणि पांढरे तीळ दान करावे. याशिवाय दूध किंवा तूप देखील दान करू शकतात.

मकरसंक्रांतीला सिंह राशीच्या व्यक्तींनी पाण्यात लाल फुल आणि कुंकू टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. ते खूप फायदेशीर ठरू शकेल. याशिवाय तुम्ही तांबे आणि गहू दान करू शकता.

मकरसंक्रांतीला कन्या राशीच्या व्यक्तींनी पाण्यात दूध, तांदूळ, तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच खिचडी, ब्लँकेट आणि हिरवे कपडे दान करावे. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल, असे सांगितले जाते.

मकरसंक्रांतीला तूळ राशीच्या व्यक्तींनी चंदन, दूध, तांदळाचे दान करावे. याशिवाय तुम्ही पांढरे वस्त्र, साखर आणि ब्लँकेट दान करू शकता.

मकरसंक्रांतीला वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पाण्यात लाल फुल , कुंकू मिसळून सूर्याला अर्घ्य द्यावे, तसेच गुळाचे दान करावे. याशिवाय वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल वस्त्र आणि तीळ दान करावे. याचा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

मकरसंक्रांतीला धनु राशीच्या व्यक्तींनी पाण्यात हळद, केशर, पिवळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच पिवळे वस्त्र, पिवळी मसूर, हळद यांचे दान करावे.

मकरसंक्रांतीला मकर राशीच्या व्यक्तींनी पाण्यात काळे तीळ, निळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच ब्लँकेट, काळे तीळ आणि तेल दान करावे.

मकरसंक्रांतीला कुंभ राशीच्या व्यक्तींनी पाण्यात काळे तीळ, निळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे व काळ्या तीळाचे दान करावे. याशिवाय तुम्ही काळे उडीद, काळे कपडे यांचेही दान करू शकता.

मकरसंक्रांतीला मीन राशीच्या व्यक्तींनी पाण्यात केशर, हळद आणि पिवळे फुल टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच रेशमी वस्त्र, हरभरा डाळ, तीळ आणि तांदूळ दान करावे, असे सांगितले जाते.