साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 08:12 IST2025-08-25T07:52:11+5:302025-08-25T08:12:25+5:30
Weekly Horoscope: २४ ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: भाद्रपद महिन्याची सुरुवात झाली असून, शनिवारी बुध सिंह राशीत प्रवेश करील. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू मिथुन राशीत, बुध आणि शुक्र कर्क राशीत असून, दि. ३० रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करील. तेथे त्याची युती रवी आणि केतु यांच्याशी होईल. मंगळ कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहे.
चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. या सप्ताहात २६ रोजी हरतालिका, २७ रोजी गणेश चतुर्थी, २८ रोजी ऋषिपंचमी व जैन संवत्सरी आहे. २९ रोजी सूर्यषष्ठी आहे, तर ३० रोजी सूर्याचा पूर्वाफाल्गनी नक्षत्रात प्रवेश होणार आहे.
गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या राशींना अतिशय आनंददायी, सुखाची, समाधानाची, धन-धान्य देणारी ठरू शकेल? ऑगस्ट महिन्याची सांगता कोणत्या राशींना सकारात्मक अनुकूलता देऊ शकेल? जाणून घेऊया...
मेष: आर्थिक गुंतवणुकीची एखादी योजना तयार कराल. आर्थिक प्राप्तीचे स्रोत वाढतील. आर्थिक लाभ झाल्यामुळे आपण खुश व्हाल. असे असले तरी आपण वायफळ खर्च कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती काहीसे त्रासून जातील. कामात चूक होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कामांना प्राधान्य द्यावे लागेल. व्यापाऱ्यांनी व्यावसायिक भागीदारी करण्याचा विचार करू नये. भागीदारी केल्यास भागीदार फसवणूक करण्याची शक्यता आहे. एखादी मोठी ऑर्डर मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीवर विश्वास ठेवून वाटचाल करावी लागेल. जर एखादा विषय शिकण्यात समस्या असली तर ती दूर होईल. त्यासाठी त्यांना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागू शकतो.
वृषभ: खुशखबर मिळू शकेल. आर्थिक स्थितीची काळजी घ्यावी लागेल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार काम करणे हिताचे होऊ शकेल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्यास समस्येत भर पडेल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत भ्रमित होतील. कशाचे तरी टेन्शन असण्याची शक्यता आहे. अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकणार नाही.
मिथुन: कोणतीही आर्थिक समस्या असणार नाही. सढळहस्ते खर्च करू शकाल. राहणीमानावर भरपूर पैसा खर्च कराल. त्या नंतर कदाचित आर्थिक समस्येस सामोरे जावे लागू शकते. कारकिर्दी विषयक थोडे टेन्शन असू शकते. कामावर लक्ष केंद्रित करून कारकीर्द उंचावण्याचा प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थी त्रस्त राहतील. अभ्यासातील समस्यांमुळे मन विचलित होऊ शकते. त्यांचे लक्ष अभ्यासाकडे कमी व इतर प्रवृत्तीत जास्त राहील.
कर्क: आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घराच्या सुशोभीकरणावर जास्त पैसे खर्च करण्याचा विचार कराल. स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्या शारीरिक समस्येसाठी पैसा खर्च कराल. व्यवसाय वाढीत मदतरूप होऊ शकतील अशा अनेक लोकांची भेट व्यापारी घेतील. कोणताही व्यापारी सौदा विचारपूर्वकच करावा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामगिरीने प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकेल. असे असले तरी ते इतर प्रवृत्तीत गुंतण्याची संभावना आहे. एखाद्या नवीन संशोधनासाठी आठवडा अनुकूल आहे. आहारासह आपल्या दिनचर्येत बदल करावा लागेल.
सिंह: आर्थिक बाबीत नशिबाची साथ मिळेल. एखाद्या पैतृक संपत्तीचा लाभ होऊ शकतो. असे असले तरी चुकीच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू नये, अन्यथा समस्येत वाढ होईल. आर्थिक बाबीत मनमानी करून चालणार नाही. व्यापाऱ्यांना कामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कर्ज सहजपणे मिळू शकेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. मेहनतीने एक नवीन ध्येय गाठू शकाल. विद्यार्थ्यांना एकाग्रता टिकवून ठेवावी लागेल. काही कौटुंबिक समस्यांमुळे त्यांची एकाग्रता भंग पावण्याची संभावना असून त्यांच्या ज्ञानावर त्याचा प्रभाव पडू शकतो.
कन्या: आर्थिक बाबीत सावध राहावे लागेल. दिखाऊपणा व्यतिरिक्त काही सक्तीच्या कामांसाठी पैसा खर्च करावा लागेल. आर्थिक गुंतवणूकीचा विचार कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामगिरीने खुश होतील. पगारवाढ संभवते. व्यापाऱ्यांनी व्यवसायात दिखाऊपणा कारणे टाळावे. प्रकल्पावर पूर्ण लक्ष दिल्यास चांगला लाभ होऊ शकेल. विद्यार्थी काहीसे गोंधळून जातील. त्यांचे मन भ्रमित झाल्याने ते त्रासून जातील. एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत वाढविली तरच त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल. कामानिमित्त धावपळ झाली तरी अधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी लागेल.
तूळ: विचारपूर्वक खर्च करावे लागतील. कोणाच्या सांगण्यावरून चुकीच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू नये. शेअर्स बाजारात गुंतवणूक करणे हितावह होईल. व्यापाऱ्यांनी एखादा प्रकल्प विचारपूर्वक सुरू करावा. कोणतेही कर्ज काढू नये. अन्यथा त्यात नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्या व्यक्ती चांगली मोठी वाढ घेऊन कोणत्याही दुसऱ्या नोकरीचा स्वीकार करू शकतात. असे असले तरी सध्याच्या नोकरीत पदोन्नती होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासास प्राधान्य द्यावे लागेल. त्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. अन्यथा स्पर्धेत यशस्वी होणे अवघड होऊन बसेल. तेव्हा पूर्ण तयारी करावी.
वृश्चिक: आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल असल्याने फुटकळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणालाही पैशांच्या बाबतीत शब्द देऊ नये. प्राप्तीचे स्रोत वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे. व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते. विचारपूर्वक व्यवसाय करावा. बँकेशी संबंधित व्यक्तींना चांगला लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती समस्याग्रस्त असल्याने त्यांचे मन कामात रमणार नाही. ते दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू लागतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम न मिळाल्याने ते निराश होतील. अभ्यासास योग्य तितका वेळ देऊ शकलो नसल्याने नुकसान झाल्याचे त्यांना जाणवेल. प्राणायाम व ध्यान-धारणा करणे हितावह होईल.
धनु: आर्थिकदृष्ट्या अनुकूल आहे. प्राप्तीची विविध स्रोत मिळतील. एखादा भाड्याचा व्यवसाय करत असाल तर त्यात चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी कामात सामंजस्य दाखवावे. कोणावर विश्वास ठेवू नये. नोकरीत एक नवीन ओळख निर्माण कराल. व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल. विद्यार्थी अभ्यासात मग्न राहतील. त्यांनी कोणत्याही कामात अति उत्साहित होणे टाळावे, अन्यथा मनाचा गोंधळ उडू शकतो. प्रकृतीच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. कामानिमित्त बाहेरगावी गेलात तर थोडा वेळ विश्रांतीसाठी काढावा.
मकर: आर्थिक समस्या त्रस्त करतील. कोणाला उसने पैसे देऊ नये. कारकिर्दीच्या दृष्टीने आशादायी काळ आहे. कोणताही बदल करू नये. भागीदारीत व्यवसाय करू नये. विद्यार्थी एखाद्या समस्येने त्रासून जातील. अभ्यासास आवश्यक तितका वेळ देऊ न शकल्याने त्यांना नुकसान सोसावे लागू शकते. विषय बदलण्याचा विचार त्यांनी करू नये. योगासन किंवा व्यायाम यावर भर देणे हिताचे ठरू शकेल.
कुंभ: विचार न करता पैसे खर्च कराल. मात्र, तसे करू नये. खर्च विचारपूर्वकच करावेत. घर सजावटीकडे लक्ष द्याल. व्यापाऱ्यांना पुढील योजनांवर लक्ष द्यावे लागेल. कामानिमित्त काही प्रवास कराल. नोकरी करणाऱ्यांची धावपळ झाल्याने ते त्रासून जातील. विद्यार्थ्यांना अभ्यास चालूच ठेवावा लागेल. ते एखाद्या सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करू शकतात. त्यांना अध्ययनासाठी वेळ काढावा लागेल. अभ्यासाच्या बाबतीत काही गोंधळ होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
मीन: आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची संभावना आहे. एखादे घर किंवा जमीन इत्यादी खरेदी केल्यास ते हितावह होईल. एखाद्या योजनेत दीर्घ कालावधीसाठी आर्थिक गुंतवणूक करू शकता. कोणत्याही प्रकारे घाई करू नये. नोकरी करणाऱ्यांना कामाचे आधिक्य राहिल्याने ते त्रासून जातील. त्यांना वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. विद्यार्थ्यांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. अभ्यासात येणाऱ्या समस्या ते सहजपणे दूर करू शकतील. बाहेरगावी जाऊन अभ्यास करणे हितावह होईल. त्यामुळे मित्रांपासून दूर राहू शकाल.