पंचग्रही समसप्तक योगात विजया एकादशी २०२६: १० राशींची इच्छापूर्ण, पद-पैसा-लाभ; शत्रूंवर विजय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:07 IST2026-02-12T07:07:07+5:302026-02-12T07:07:07+5:30
Vijaya Ekadashi February 2026 Astrology: माघ महिन्यातील विजया एकादशीला जुळून येत असलेल्या शुभ योगांचा कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

Vijaya Ekadashi February 2026 Astrology: प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. माघ वद्य एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते.

यंदा शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी विजया एकादशी आहे. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. जो साधक या व्रताचे माहात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सन २०२६ मध्ये आलेल्या विजया एकादशीला अनेक शुभ योग जुळून आलेले आहेत. कुंभ राशीत चतुर्ग्रही योग, ग्रहण योग जुळून आलेला आहे. तसेच पंचग्रही समसप्तक योगही जुळून आलेला आहे. या एकादशी कालावधीचा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घेऊया...

मेष: मनात उत्साह राहील. भविष्य काळाबद्दल मनात उत्सुकता आणि सकारात्मक विचार राहतील. आवडत्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. मात्र काही अडचणी येतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. थोडी आरामात कामे करा. वाहने जपून चालवा. अनुकूल परिस्थिती राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. पर्यटन व आरामदायक सोयी-सुविधा मिळतील.

वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. लोकांशी तावून-सुलाखून व्यवहार केला पाहिजे. काही लोक हातोहात फसवू शकतात. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. अडचणी दूर होतील, त्यामुळे उत्साह वाढेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. चंद्र भ्रमणामुळे सावधपणे वागण्याची गरज आहे. नोकरीत पारडे जड राहील.

मिथुन: नवीन ओळखी होतील. सकारात्मक परिणाम दिसून येतील. ओळखीचे फायदे होतील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. शैक्षणिक प्रगती पुस्तक झळकते राहील. मित्र व नातेवाईक यांच्या समवेत जवळच्या सहलीला जाऊन याल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. अनुकूल वातावरण राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. अनेक अडलेली कामे मार्गी लागतील.

कर्क: यशकारक काळ राहू शकेल. नोकरीतील बदल, घराशी संबंधित व्यवहार व कामे, मुलांची प्रगती, शैक्षणिक यश, मान-सन्मान आदी दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. मोठ्या आत्मविश्वासाने कामे कराल. योजना लोकांना आवडतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. मात्र, संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. या काळात लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो.

सिंह: सफलता मिळेल. चंद्राचे भ्रमण अनेक आघाड्यांवर यश देणारे ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. चांगले प्रस्ताव समोर येतील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. विरंगुळ्याचे क्षण अनुभवण्यासाठी पर्यटन कराल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

कन्या: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. आघाडीवर राहाल. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी सख्य राहील. जवळच्या प्रवासाचे योग येतील, नोकरीत पदोन्नती आणि वेतनवाढ मिळेल, सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने लोकांची ये-जा चालू राहील.

तूळ: चंद्र भ्रमण लाभदायक ठरू शकेल. उत्साहाने कामे कराल आणि यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल वातावरण राहील. प्रेमात असणाऱ्यांचे गैरसमज होऊ शकतात. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा एखादा अंदाज चुकू शकतो. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' हे लक्षात ठेवा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा.

वृश्चिक: अनुकूलता जाणवेल. काही अडचणी असतील. थोडा संयम ठेवल्यास अडचणीतून मार्ग निघेल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना प्रवास घडून येतील. प्रवासात सतर्क राहा. समाज माध्यमांवर सावधपणे व्यक्त व्हा. तरुण वर्गाला भेटवस्तू मिळतील. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.

धनु: पैसा मिळेल. मात्र, तो टिकवून कसा ठेवायचा, यावर लक्ष देण्याची गरज आहे. एखादी चांगली बातमी कळेल, महत्त्वाच्या कामात लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. एखाद्या उलाढालीत फायदा होईल. चंद्र भ्रमणामुळे संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नियमानुसार कामे होतील, याकडे कटाक्षाने लक्ष द्या. प्रवासात सतर्क राहा. परिस्थिती आटोक्यात येईल.

मकर: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल तर फायद्यात राहाल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगलकार्याचे आयोजन करण्यात येईल. भेटीगाठी फलद्रूप होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू प्राप्त होतील. कामाचा ताण राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवासात सतर्क राहा.

कुंभ: चंद्राचे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. नवनवीन संथी, कार्यक्षेत्रातील प्रगती, धनलाभ, इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाह जुळून येईल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील, नशिबाचा कौल बाजूने राहील. एखादी चांगली बातमी कळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.

मीन: मुलांची प्रगती होईल. अनुकूल वातावरण राहील. काही अडचणी असतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. परिस्थिती नियंत्रणात येईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत बढती, मनासारखे बदल, पगारवाढ, सोयी-सुविधांत वाढ, अशा प्रकारची फळे मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















