शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:12 IST2025-09-15T13:08:09+5:302025-09-15T13:12:32+5:30

Venus Transit 2025: १४ सप्टेंबर रोजी पहाटे १२:१६ वाजता सूर्याच्या सिंह राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे(Shukra Gochar 2025) शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. ज्याचा लाभ ६ राशींना होणार असून आगामी काळ त्यांच्यासाठी सुख सोयींनी युक्त असणार आहे.

सिंह राशीत शुक्राच्या भ्रमणामुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण झाला आहे. शुक्र हा भौतिक सुख अर्थात ऐषोरामी जीवन, गृह सौख्य देणारा आहे तर सूर्य हा तेज देणारा आहे, या प्रभावी योगामुळे १२ राशींवर त्याचा कसा प्रभाव पडणार आणि ६ राशींना काय लाभ होणार आहे, ते पाहू.

मेष : मेष राशीच्या पाचव्या घरात शुक्र भ्रमण झाले आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना कौटुंबिक जीवनात काही काळ तणाव सहन करावा लागू शकतो. अस्थिर मनामुळे अस्वस्थता जाणवेल, पण तुमच्या नियमित उपासनेचा लाभ होऊन मन शांत होईल. या काळात खर्च वाढतील त्यामुळे अनावश्यक गोष्टी तूर्तास टाळा.

वृषभ : शुक्र तुमच्या चौथ्या घरात भ्रमण करत आहे. काही घटनांमुळे भावुक व्हाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.वरिष्ठांशी जुळवून घ्या, वाद टाळा. सामजस्यांने वागा. आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. आर्थिक बाबतीत हा काळ अटी तटीचा असेल.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांच्या तिसऱ्या घरात शुक्राचे भ्रमण झाले आहे. शुक्राचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल. या काळात तुमच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती होईल आणि संधीचे सोने कराल.

कर्क : कर्क राशीच्या दुसऱ्या घरात शुक्र ग्रहाचे भ्रमण झाले आहे. हा काळ तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक ठरेल. नोकरी, व्यवसाय, करिअरच्या बाबतीत तुम्हाला संयमी भूमिका घ्यावी लागेल. कामाचा ताण जाणवल्याने थोडा थकवा जाणवेल, पण एखादी व्यक्ती अनपेक्षित आनंद देऊन जाईल.

सिंह : शुक्राचे गोचर तुमच्या लग्नात म्हणजेच पहिल्या घरात असेल. ज्यामुळे तुम्हाला सुख, संपत्ती, ऐश्वर्य उपभोगता येईल. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम वाटेल. परंतु, तुमच्या कारकिर्दीत कामाचा ताण जास्त असल्याने तुम्हाला ताण जाणवेल. तथापि, तुम्ही नफा मिळविण्यात देखील यशस्वी व्हाल.

कन्या : शुक्र तुमच्या राशीच्या बाराव्या घरात भ्रमण करत आहे. या काळात तुम्ही अनेक धार्मिक यात्रा कराल आणि नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकेल. नोकरी करणारे लोक नवीन नोकरी शोधू शकतात. आर्थिक परिस्थिती सांभाळा.

तूळ : शुक्र तुमच्या अकराव्या घरात भ्रमण करत आहे. हे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या भ्रमणाच्या प्रभावामुळे तुमच्या नोकरी व्यवसायत नफा, समाधान आणि आनंद मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी देखील मिळतील. आर्थिकदृष्ट्या, हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तसेच, तुमच्या कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.

वृश्चिक : तुमच्या राशीच्या दहाव्या घरात शुक्र ग्रहाचे भ्रमण होणार आहे. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. कामाचा ताण आणि आरोग्याच्या कुरबुरी यामुळे त्रास होईल. खर्चाकडे लक्ष द्या, अनावश्यक गोष्टींचा मोह टाळा.

धनु : शुक्र तुमच्या राशीच्या नवव्या घरात भ्रमण करेल. यश मिळविण्यात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते. वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने उदास होण्याची शक्यता आहे, नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो. तरी उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल.

मकर : शुक्र ग्रह मकर राशीच्या आठव्या घरात भ्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. प्रतिष्ठा सांभाळा. व्यावसायिकांचा त्यांच्या भागीदारांशी वाद होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील.

कुंभ : शुक्र कुंभ राशीच्या सातव्या घरात भ्रमण करेल. नातेसंबंध सांभाळा. प्रवास योग आहेत. नवीन ओळखीमुळे नवे काम आणि आर्थिक लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळाल्याने नाते दृढ होईल.

मीन : शुक्र मीन राशीच्या सहाव्या घरात भ्रमण करत आहे. मित्रपरिवार तसेच नाते संबंधात बिघाड होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या आणि संतुलित आहार घ्या. अध्यात्मिक कार्यक्रम आनंद देईल.