Surya Grahan April 2023: सूर्यग्रहणाला ५ शुभ योग: ५ राशींवर कृपा धनलक्ष्मीची, संधी यश, प्रगतीची; सुख-समृद्धी वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 07:07 AM2023-04-17T07:07:07+5:302023-04-17T07:07:07+5:30

first solar eclipse of 2023: सूर्यग्रहणाचा काही राशींना शुभ-लाभ मिळू शकेल. अडकलेले पैसे, येणी वसूल होण्याचे योग जुळून येऊ शकतील. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही या घटनेला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. याला सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहु किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर पौर्णिमेला राहुच्या किंवा केतुच्या जवळच असावा लागतो. सन २०२३ चे पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी होत आहे. सूर्यग्रहणाच्या काहीच दिवस आधी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. हे ग्रहण मेष राशीत लागणार आहे. याशिवाय ग्रहणावेळी सूर्य अश्विनी नक्षत्रात असेल.

आताच्या घडीला राहु मेष राशीत विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि राहुचा ग्रहण योग जुळून येत आहे. सूर्यग्रहणावेळी मेष राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी मेष राशीत सूर्य, बुध आणि राहु हे ग्रह विराजमान असतील. यामुळे ५ अत्यंत शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे.

२० एप्रिल रोजी लागणारे सूर्यग्रहण सकाळी ०७ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी समाप्त होईल. हे सूर्यग्रहण खग्रास प्रकारातील असणार आहे. सूर्यग्रहण चैत्र अमावास्येला लागत असून, या दिवसापासून सौर ग्रीष्म ऋतुला प्रारंभ होत आहे. वास्तविक पाहता भारतातून सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे या दिवशी वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे.

सूर्यग्रहणाच्या दिवशी युती योग, सर्वार्थ सिद्धी योग, बुधादित्य योग, हंस योग आणि प्रीतीसारखे शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वास्तविक पाहता, ग्रहणाची घटना शुभ मानली जात नसली तरी शुभ योगामुळे सूर्यग्रहण काही राशींसाठी खूप फायदेशीर आणि आनंददायी ठरू शकते.

सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ पाळू नये, असे सांगितले जात आहे. मात्र, या सूर्यग्रहणाचा ५ राशींवर अतिशय शुभ प्रभाव पडू शकेल, असे म्हटले जात आहे. करिअर, नोकरी, आर्थिक आघाडीसह जीवनातील अनेकविध क्षेत्रात या ५ राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत, त्या लकी राशी? जाणून घेऊया...

मिथुन राशीच्या व्यक्तींना यंदाचे पहिले सूर्यग्रहण फायदेशीर ठरू शकेल. कार्यक्षेत्रातील कामाचे कौतुक होऊ शकेल. आत्मविश्वास वाढेल. तुमचे टॅलेंटही सर्वांसमोर येऊ शकेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे समाजात आदर वाढू शकेल. काही खास लोकांना भेटू शकता, ज्याचा भविष्यात फायदा होईल. अडकलेला पैसाही मिळू शकेल. कौटुंबिक वातावरणही अनुकूल राहू शकेल. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना यंदाचे पहिले सूर्यग्रहण नशिबाची साथ मिळणारे ठरू शकेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहू शकेल. पालकांसोबत काही खास ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. जवळचे मित्र, कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. व्यक्तिमत्व सुधारेल. परदेशात जायचे असेल तर इच्छा पूर्ण होण्याचे योग जुळून येऊ शकतात. भौतिक सुखांचा आनंद मिळू शकेल. अनेक नवीन लोकांशी ओळख होऊ शकेल. मित्रांसोबत खूप वेळ घालवू शकाल.

सिंह राशीच्या व्यक्तींना यंदाचे पहिले सूर्यग्रहण सुखकारक सिद्ध होऊ शकेल. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढू शकेल. मुलांची प्रगती होऊ शकेल. मन प्रसन्न राहील. व्यवसायात प्रगती झाल्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतील. अडकलेला पैसा प्राप्त होऊ शकेल. जमीन किंवा वाहन खरेदी करू शकाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. सकारात्मक ऊर्जा मिळू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना यंदाचे पहिले सूर्यग्रहण सकरात्मक ठरू शकेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. अधिकारी, सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहू शकतील. कामाच्या ठिकाणी अधिकार वाढू शकेल. टीमचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकेल. सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल.अनेक कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. घरखर्चाच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. परंतु, पैशांची बचत करण्यात यश मिळू शकेल. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या संधी मिळू शकतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना यंदाचे पहिले सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकेल. समाजात स्थान मजबूत होऊ शकेल. वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतील. मात्र, नशिबावर अवलंबून न राहता मेहनतीने काम करत राहिल्यास अधिक यश मिळू शकेल. काही चढ-उतारांनंतर हळूहळू परिस्थिती सामान्य होईल. नाते मजबूत होईल.

सूर्यग्रहणानंतर गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करत आहे. गुरुच्या मेष प्रवेशामुळे गुरु, सूर्य, बुध आणि राहु यांचा चतुर्ग्रही योग जुळून येऊ शकेल. तसेच २२ एप्रिल रोजी असणाऱ्या अक्षय्य तृतीयेलाही अनेक शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.