१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:49 IST2025-08-20T17:37:16+5:302025-08-20T17:49:18+5:30
१० दिवसांसाठी लक्ष्मी नारायण योग जुळून येत असून, कोणत्या राशींना याचा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नियोजित वेळेनुसार ग्रहांचे गोचर होत असते. या ग्रहांच्या गोचरामुळे काही शुभ तर काही प्रतिकूल योग जुळून येत असतात. ग्रहांच्या युतीचा किंवा योगांचा केवळ राशींवर नाही तर देश-दुनियेवर प्रभाव पडत असतो.
२० ऑगस्ट २०२५ रोजी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क राशीत बुध ग्रह विराजमान आहे. शुक्राच्या प्रवेशानंतर बुधाशी युती होऊन लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. १० दिवसांनंतर बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
बुध ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशानंतर या योगाची समाप्ती होईल. परंतु, या कालावधीत अनेक राशींना विविध लाभ प्राप्त होऊ शकतात. नोकरी, व्यापार, व्यवसाय, शिक्षण, कौटुंबिक तसेच आर्थिक आघाडीवर काही सकारात्मक अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.
मेष: शुक्र गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारू शकते. मन उपासनेत गुंतवून ठेवणे चांगले राहील. अध्यात्माकडे अधिक कल राहू शकेल.
मिथुन: सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. कला किंवा संगीत क्षेत्राशी संबंधित लोकांवर विशेष प्रभाव पडू शकतो. कुटुंबात एखादा महत्त्वाचा प्रसंग येऊ शकतो. प्रियजनांसोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रशासन किंवा सरकारशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. मानसिक समाधान, शांतता लाभू शकेल.
कर्क: अधिक सुविधा प्राप्त होऊ शकतात. विशेषतः पैशाशी संबंधित बाबींमध्ये ग्रहांचे अनुकूल सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनाच्या दृष्टिकोनातून शुक्र गोचर अनुकूल राहणार आहे. धन आणि भाग्य वृद्धी होऊ शकेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी घरात स्वच्छता, व्यवस्थित आणि कचरामुक्त ठेवावे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद राखणे शुभ राहील. व्यवसाय आणि उत्पन्न वाढू शकेल. सामाजिक प्रतिमा सुधारू शकेल.
सिंह: धन आणि सुखात वृद्धी होऊ शकेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील समस्या संपू शकतात. कल अध्यात्माकडे अधिक असू शकतो. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशात शिक्षण घेण्याचे दरवाजे उघडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. परदेशातून नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. भौतिक सुख मिळू शकते. काही चांगली बातमी मिळू शकते.
कन्या: ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे व्यावसायिकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. जीवनातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अनेकविध लाभ प्राप्त होऊ शकते. संपत्ती आणि संधी वाढू शकतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात नशिबाची साथ मिळू शकेल. हे फायदे केवळ पैशाच्या बाबतीतच नव्हे तर जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये मिळू शकतील. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये योजलेल्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकता.
वृश्चिक: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात जलद वाढ होऊ शकते. यासोबतच मोठी डील किंवा ऑर्डर मिळू शकते. सरकारी खात्यांशी संबंधित लोकांनाही फायदे मिळू शकतात. अध्यात्माकडे कल असेल. घरी किंवा जवळच्या नातेवाईकाच्या घरी शुभ कार्य होऊ शकते. उत्पन्नात जलद वाढ होऊ शकते. परदेशाशी संबंधित बाबींमध्येही यश मिळू शकते.
धनु: शुक्र गोचराने धनु राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. हे संक्रमण चांगले दिवस घेऊन येऊ शकेल. उद्योगपतींसाठी हा काळ चांगला मानला जात आहे. हाती पैसा येईल. काही लोक कर्जातून मुक्त होऊ शकतील. कुटुंबासह प्रवास करण्याची योजना आखू शकता. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ मानला जात आहे.
मीन: काही खूप सकारात्मक परिणाम मिळू शकतात. विशेषतः कला आणि साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. ते अत्यंत सर्जनशील राहू शकतात. मनोरंजनाशी संबंधित बाबींमध्येही सकारात्मक ट्रेंड दिसून येतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार नियंत्रित करणे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असेल. प्रेमसंबंधांवर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.