Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:27 IST2025-07-26T13:42:27+5:302025-07-26T14:27:16+5:30

Shravan 2025: श्रावण(Shravan 2025) हा महादेवाचा महिना. संबंध महिनाभर भाविक शिव उपासनेत रंगून जातात. महादेवाच्या दर्शनासाठी शिव मंदिरात जातात. नंदी महाराजांच्या कानात इच्छा सांगतात आणि भोलेनाथासमोर तीनदा टाळ्या वाजवतात. काय असावे त्यामागचे कारण? चला जाणून घेऊ.

शिवमंदिरात जाऊन महादेवाला दूध पाण्याचा अभिषेक करणे, भस्म विलेपन करणे, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे हे आपण जाणतो, पण त्या गाभाऱ्यात जेव्हा टाळ्यांचा आवाज घुमतो तेव्हा आपले कुतूहल जागे होते, या टाळ्या नेमक्या कशासाठी? तीनदाच का? शास्त्रीय आणि पौराणिक कारण जाणून घेऊ.

शिवमंदिरात गेल्यावर अनेक लोक तीनदा टाळ्या वाजवतात. ही एक आध्यात्मिक आणि धार्मिक प्रथा आहे, जी भगवान शिव यांच्याप्रती श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या तिन्ही टाळ्यांना वेगवेगळे अर्थ आहेत. पहिली टाळी देवासमोर उपस्थिती दर्शवते, दुसरी इच्छा दर्शवते आणि तिसरी क्षमा करण्याची विनंती करते. या तीन टाळ्या कोणासाठी असतात? तर...

असे मानले जाते की यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना तीन टाळ्या वाजवून आवाहन केले जाते. याद्वारे तिन्ही देवांना वंदन केले जाते. हे भगवान शिवाच्या त्रिगुण स्वरूपाच्या म्हणजेच सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणाच्या पूजेचे प्रतीक आहे.

रावण हा शिवभक्त होता, तोदेखील शिव उपासना झाल्यावर तीनदा टाळी वाजवून त्रिभुवनात असलेली शक्ती अर्जित करण्याची प्रार्थना करीत असे. ती ताकद त्याला मिळाली आणि सृष्टीतले वैभवही प्राप्त झाले.

त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनीदेखील रामेश्वरम येथून लंकेस जाण्यासाठी रामसेतूची उभारणी करताना भगवान शिवाची आराधना केली आणि त्या पूजेनंतर तीन टाळ्या वाजवून त्रिकाळ विजय मिळावा म्हणून प्रार्थना केली, त्याचा लाभ झाला आणि त्यांना यश मिळाले.

काही लोकांचा असा विश्वास आहे की तीनदा टाळ्या वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते. खरं तर, टाळ्या वाजवल्याने कंप निर्माण होतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते. तसेच तीन वेळा टाळ्या वाजवल्याने हाताच्या अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दबाव येतो. यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि आरोग्यासाठी फायदे मिळतात आणि शिव मंदिरातील ऊर्जा शरीरात सामावून घेता येते