Shravan 2021 : कुरुक्षेत्रावर झालेल्या नरसंहाराचे प्रायश्चित्त म्हणून पांडवांनी या ठिकाणी उभारले होते शिव मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:13 PM2021-09-01T17:13:40+5:302021-09-01T17:22:18+5:30

Shravan 2021 : शिवालयात आपण नेहमीच जातो. तिथे शिवलिंगाची पूजा करतो. परंतु भारतात असे एक शिवमंदिर आहे, जिथे शिवशंकराच्या हृदयाची आणि भूजांची पूजा होते. एवढेच नाही, तर जगातील हे सर्वात उंचावर वसलेले मंदिर आहे. जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास.

उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून ३,६८० मीटर उंचीवर तुंगनाथ पर्वतावर हे मंदिर स्थित आहे. या पर्वतामुळे मंदिराला तुंगनाथ मंदिर अशी ओळख मिळाली आहे. हे ठिकाण महादेवाच्या सर्वात प्रिय पाच केदारांपैकी एक आहे. या मंदिरात शिव शंकराच्या हृदय आणि भूजांची पूजा केली जाते. या मंदिराच्या पूजेची जबाबदारी मक्कानाथ गावातील स्थानिक ब्राह्मणांकडे सोपवली आहे. मैथानी ब्राह्मण पिढ्यानपिढ्या तिथे सेवा देत आहेत.

या मंदिराबाबत कथा सांगितली जाते ती अशी, की महाभारत काळात कुरुक्षेत्रावर जो मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला होता, त्यावर देवाधिदेव महादेव रुष्ट झाले होते. त्यावेळेस पांडवांनी शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी या मंदिराची उभारणी केली व बराच काळ तिथे राहून उपासना केली. शिवशंकराचे हृदय जिंकून घेतले व त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. म्हणून शिवशंकराच्या हृदयाची व भूजांची पूजा केली जाते अशी मान्यता आहे.

याशिवाय अशीही एक कथा सांगितली जाते, की माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी या शिवमंदिरात प्रार्थना केली होती. त्याचप्रमाणे असेही मानले जाते, की रामायणकाळात रावणाचा वध केल्यावर ब्राह्मणवधाचे पातक दूर करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी या ठिकाणी येऊन शिवउपासना केली होती. तेव्हापासून या स्थानाला चंद्रशिला असेही नाव प्राप्त झाले.