४८ दिवस शनी-मंगळ समसप्तक योग: देशात मोठ्या घडामोडींचे संकेत; १२ राशींवर कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:07 AM2023-07-06T07:07:07+5:302023-07-06T07:10:02+5:30

शनी आणि मंगळाचा समसप्तक योग फारसा अनुकूल मानला जात नाही. कोणत्या राशीच्या व्यक्तींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

जुलै महिन्यात अनेकविध घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे चातुर्मास सुरू झाला असून, दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार ४ महत्त्वाच्या ग्रहांचे राशीपरिवर्तन या महिन्यात होत आहे. यातच जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या मंगळाच्या राशीपरिवर्तनामुळे महत्त्वाचा मानला गेलेला समसप्तक योग जुळून येत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रहाने राशीपरिवर्तन केल्यानंतर त्याचा देश-दुनियेसह सर्व राशींवर प्रभाव पडत असतो. ग्रहाच्या शुभ-प्रतिकूल योग-युती यांमुळेही अनेक परिवर्तने घडू शकतात, असे सांगितले जाते. मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला असून, यामुळे शनी आणि मंगळ या ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहे.

आताच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह कुंभ राशीत वक्री चलनाने विराजमान आहे. तर नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह सिंह राशीत विराजमान झाला आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या स्थानी विराजमान आहेत. म्हणूनच शनी आणि मंगळ ग्रहाच्या जुळून आलेल्या या योगाला समसप्तक योग असे म्हटले गेले आहे.

सुमारे ४८ दिवस शनी आणि मंगळ ग्रहाचा समसप्तक योग कायम राहील, असे सांगितले जात आहे. हा योग फारसा अनुकूल मानला जात नाही. समसप्तम योग तयार झाल्यामुळे काही भागात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या भागात पाऊस सामान्यपेक्षा थोडा कमी असू शकतो.

तर बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाच्या सिंह राशीतील प्रवेशानंतर सोने, चांदी, तांबे आणि लाल रंगाच्या वस्तू महाग होऊ शकतात. तसेच काही वस्तू स्वस्त होऊ शकतात.

शनी आणि मंगळ ग्रहांचा समसप्तक योग ५ राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतो. वृषभ, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु राशीसाठी समसप्तक योग फायदेशीर ठरू शकेल. या काळात करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तसेच, व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. अचानक पैसे मिळू शकतात. यासोबतच नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

यासोबतच काम-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकेल. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मालमत्ता तसेच वाहन सुख मिळू शकते. दुसरीकडे, जे लोक स्थावर मालमत्ता, जमीन संबंधित काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरू शकेल.

दुसरीकडे शनी आणि मंगळ ग्रहाचा समसप्तक योग मेष, कर्क, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काहीसा त्रासदायक ठरू शकेल. काही समस्या, अडचणींना सामोरे जावे लागू शकेल. वाहन काळजीपूर्वक चालवण्याचा सल्ला दिला जात आहे.

आपण कोणालाही पैसे देणे टाळावे. तसेच, या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे म्हटले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.