Sadhguru Solo Bike Ride: २७ देश, १०० दिवस अन् ३० हजार किमी प्रवास...लंडन ते भारत बाइक यात्रेवर का निघाले सदगुरु?, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:41 PM2022-03-03T13:41:56+5:302022-03-03T13:48:49+5:30

Sadhguru Solo Bike Ride: सदगुरु जग्गी वासुदेव यांनी तब्बल २७ देशांच्या 'सोलो बाईक राइड'वर जाण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमागे एक विशेष कारण आहे. या 'बाइक राइड'मधून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ते जाणून घेऊयात...

महाशिवरात्रीच्या भव्य आयोजनाच्या कार्यक्रमात सदगुरू जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev) यांनी ईशा योग सेंटरमधून मोठी घोषणा केली. यात सदगुरुंनी मातीच्या संरक्षणासाठी १०० दिवसांच्या महाअभियानाची सुरुवात करत असल्याचं जाहीर केलं.

लंडन ते भारत असा एकट्यानं बाइक यात्रा करण्याचा मानस असल्याचं सदगुरूंनी यावेळी उपस्थितांना सांगितलं. या दौऱ्यात ते एकूण २७ देशांना भेट देणार असून तेथील नेत्यांशीही मातीच्या संरक्षणासाठीचं आवाहन व चर्चा करणार आहेत.

माती वाचवा मोहिमेसाठी सदगुरुंनी पुढाकार घेतला आहे. ईशा फाऊंडेशनचे संस्थापक असलेल्या सदगुरुंनी १०० दिवसांच्या आपल्या सोलो बाइक राइडमध्ये एकूण २७ देश आणि ३० हजार किलोमीटर प्रवास करणार असल्याचं सांगितलं. ही मोहिम कोणताही विरोध करण्याची पद्धत नाही किंवा कुणावर दबाव आणण्याचीही रणनिती नाही, असं ते म्हणाले.

जगातील विविध देशांतील नागरिकांमध्ये मातीच्या रक्षणासाठी इच्छेची जाणीव निर्माण करण्यासाठीचा मार्ग म्हणून ही बाइक राइड करत असल्याचं सदगुरू म्हणाले.

"बाइक राइडच्या १०० दिवसांत तुमच्यातील प्रत्येकाला पाच ते दहा मिनिटं मातीबाबत आपले विचार व्यक्त करावे लागतील. हे खूप महत्वाचं आहे. संपूर्ण जगाला १०० दिवस मातीच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं आहे", असं सदगुरू म्हणाले.

सदगुरु जग्गी वासुदेव यांनी मातीचं महत्त्व पटवून देताना शास्त्रज्ञ आणि यूएनमधी संस्थांनी व्यक्त केलेल्या अंदाजित आकडेवारीचीही माहिती यावेळी दिली. पृथ्वीवर पुढील फक्त ५५ वर्ष शेती करण्यायोग्य माती शिल्लक राहिली आहे, असं अहवालातून समोर आलं आहे. त्यामुळे मातीचा प्रश्न अतिशय गंभीर असल्याचं सदगुरु म्हणाले.

तज्ज्ञांनी भविष्यात विनाशकारी खाद्य संकट उभं राहण्याचा इशारा दिला आहे. यामुळे जगभरात भयावह गृहयुद्ध निर्माण होईल, असंही सदगुरू म्हणाले. तसंच त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या श्रोत्यांना एक महत्वाचं आवाहन देखील केलं आहे.

"माती एकमेव जादुई गोष्ट आहे. जिथं मृत्यूनंतर दफनविधी केल्यानंतरही जीवनाचे अंकुर याच मातीत उमलतात. आपण याच मातीतून जन्मलो आहोत. याच मातीतून आपल्याला जेवण मिळतं आणि मृत्यूनंतर याच मातीत मिसळून जातो. त्यामुळे या मातीचं रक्षण करण्याची जबाबदारी या भूतलावरील प्रत्येकाची आहे", असं सदगुरू म्हणाले.