Numerology: तुमच्या मुलांकात दडलंय हनुमानासारखं बळ; करिअर आणि आयुष्यात यश मिळवण्याचं 'हे' आहे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:48 IST2026-03-31T15:38:26+5:302026-03-31T15:48:36+5:30

Numerology: २ एप्रिल, हनुमान जयंतीच्या(Hanuman Jayanti 2026) शुभ मुहूर्तावर अशा मूलांकाबद्दल जाणून घेऊ जे अंकशास्त्रानुसार 'पॉवरफुल' आणि प्रभावशाली मानले जातात. हनुमंताचे गुण जसे की अफाट शक्ती, निर्भयता, बुद्धिमत्ता आणि प्रचंड यश मिळवूनही असलेली कमालीची विनम्रता, हे गुण काही विशिष्ट मुलांकांच्या व्यक्तींमध्ये प्रकर्षाने दिसून येतात.

अंकशास्त्रानुसार प्रत्येक तारखेवर, वारावर जसा ग्रह, नक्षत्रांचा प्रभाव असतो, तसा देवी देवतांचाही प्रभाव असतो. त्यामुळे स्वाभाविकच त्या देवतेचे गुण संबंधित व्यक्तीत उतरतात. मात्र त्या शक्तीपासून आपण अनभिज्ञ असतो. ती जाणून घेण्यासाठी अंकशास्त्राची मदत घेऊया.

मुलांक १ चे स्वामी सूर्यदेव आहेत, जे हनुमानाचे गुरु मानले जातात. हनुमानाप्रमाणेच या लोकांमध्ये अफाट तेज आणि नेतृत्व करण्याची उपजत शक्ती असते. तुम्ही कठीण प्रसंगात डगमगून न जाता धैर्याने मार्ग काढता. या हनुमान जयंतीला तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आणि प्रलंबित कामे वेगाने मार्गी लागतील. तुमची ध्येयवादी वृत्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल.

चंद्र हा या मुलांकाचा स्वामी आहे, जो मनाचा कारक आहे. हनुमानाची प्रभू रामावर जशी अढळ भक्ती होती, तशीच निष्ठा तुमच्या स्वभावात दिसून येते. तुम्ही मनाने अत्यंत हळवे पण कर्तव्याच्या बाबतीत ठाम असता. या काळात तुमची मानसिक शक्ती वाढेल आणि रखडलेले निर्णय तुम्ही मार्गी लावू शकाल. हनुमान जयंतीनिमित्त तुमच्या घरातील आनंदाचे वातावरण अधिक वाढेल.

हनुमानाला 'बुद्धिमतां वरिष्ठम्' (बुद्धिवानांमध्ये श्रेष्ठ) म्हटले जाते आणि मुलांक ३ चे स्वामी गुरु देखील ज्ञानाचे प्रतीक आहेत. तुमच्याकडे ज्ञानाचा खजिना असून तुम्ही इतरांना मार्गदर्शन करण्यात पटाईत असता. तुमची संवादकला आणि बुद्धिमत्ता तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळवून देईल. या आठवड्यात नवीन शिकण्याची संधी मिळेल, जी भविष्यात खूप लाभदायक ठरेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.

राहुचा प्रभाव असलेला हा मुलांक अत्यंत कष्टाळू आणि अनपेक्षित निकाल देणारा आहे. हनुमानाने जसे अशक्य वाटणारे समुद्र उल्लंघनाचे कार्य शक्य केले, तशीच जिद्द तुमच्यात असते. तुम्ही संकटांना घाबरत नाही आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी साध्य करता. आर्थिक बाबतीत प्रगती होईल, पण अनावश्यक वाद टाळलेले बरे. हनुमानाची उपासना केल्यास तुमचे मानसिक धैर्य अधिक वाढेल.

बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही अत्यंत चपळ आणि हजरजबाबी असता. हनुमानाची कार्यक्षमता आणि वेग तुमच्या स्वभावात दिसून येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरून घेता आणि नवीन संधी शोधता. व्यवसायात मोठ्या गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रवासातून लाभ मिळतील आणि नवीन मित्र जोडले जातील, जे भविष्यात मदतीचे ठरतील.

शुक्र ग्रहाचा हा मुलांक सौंदर्याचा आणि सुखाचा कारक आहे. तुमच्यामध्ये सेवाभाव मोठा असतो, जो हनुमानाचा मुख्य गुण आहे. लोकांच्या मदतीला धावून जाण्यामुळे तुम्हाला खूप पुण्य आणि मानसन्मान मिळतो. कौटुंबिक आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल आणि नवीन वस्तूंच्या खरेदीचे योग येतील. स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

केतूचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही आध्यात्मिक आणि चिंतनशील असता. हनुमानाची एकाग्रता आणि ध्यानस्थ वृत्ती तुमच्यामध्ये प्रकर्षाने जाणवते. या काळात तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक रहस्याचा उलगडा होईल किंवा मनाला शांतता देणारी घटना घडेल. जुन्या वादातून तुमची सुटका होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित ध्यान धारणा करण्यावर भर द्या.

शनीचा प्रभाव असलेला हा मुलांक अत्यंत शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय आहे. शनी आणि हनुमानाचा असलेला संबंध पाहता, या मुलांकाच्या लोकांवर हनुमानाची विशेष कृपा असते. आयुष्यात कितीही संघर्ष आला तरी तुम्ही डगमगत नाही आणि अखेर विजय मिळवता. आर्थिक स्थैर्य येण्यास थोडा वेळ लागेल, पण ते टिकून राहील. कष्टाचे फळ नक्कीच मिळेल, फक्त संयम ठेवा.

हा मुलांक मंगळ ग्रहाचा आहे आणि हनुमान हे मंगळाचे अधिदेव आहेत, त्यामुळे हा मुलांक खऱ्या अर्थाने 'हनुमान शक्ती' दर्शवतो. तुम्ही अत्यंत साहसी, निडर आणि ऊर्जेने भरलेले असता. संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहण्याची ताकद तुमच्यात असते. या हनुमान जयंतीला तुम्हाला करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. तुमच्या पराक्रमाचे कौतुक होईल, फक्त रागावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही जग जिंकू शकता.