१ महिन्यात ३ रास बदलणार बुध: ‘या’ ६ राशींचे नशीब चमकेल; उत्तम संधी, धनलाभाचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 02:05 PM2022-06-28T14:05:14+5:302022-06-28T14:10:18+5:30

एकाच महिन्यात बुध तीन वेळा राशीपरिवर्तन करणार असून, हा अद्भूत योग मानला जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या...

जुलै महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात आहे. याचे कारण जुलै महिन्यात नवग्रहांपैकी ५ ग्रह स्थानबदल करणार आहेत. याचा मोठा परिणाम देश-दुनियेसह सर्व राशींवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. (mercury transit in gemini 2022)

जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ जुलै रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर, १२ जुलै रोजी शनि स्वराशीत म्हणजे मकर राशीत वक्री मार्गाने प्रवेश करणार आहे. (budh gochar in mithun rashi 2022)

शनी वक्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १३ जुलैला शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जिथे तो सूर्याची युती होऊ शकेल. तथापि, ही योग काही दिवसांसाठीच असेल कारण १६ जुलै रोजी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत जाईल.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला २ जुलै रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत जाईल. बुध स्वराशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या राशीतील बदल महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच बुध जुलैमध्ये तीनदा राशी बदलेल. प्रथम, २ जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल, १६ जुलै रोजी कर्क राशीत आणि लगेच ३१ जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करेल.

बुधच्या महिन्याभरातील राशीसंक्रमाणाचा कमी अधिक परिणाम सर्वच राशींवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सहा राशीच्या व्यक्तींना बुधच्या या गोचराचा उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकेल. या कालावधीत तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. जे लोक तांत्रिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या कामाला या काळात नवी ओळख मिळू शकते. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात भावंडांच्या अडचणी दूर करताना दिसतील. यामुळे तुमचे भावंडांसोबतचे संबंध सुधारतील.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा लाभदायक परिणाम पाहायला मिळू शकेल. तुमच्या संचित संपत्तीत वाढ होऊ शकते. नवीन योजनांमध्ये पैसे गुंतवणे उपयुक्त ठरू शकते. काही लोकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि तुम्ही समाजातील मान्यवरांनाही भेटू शकता. कामामुळे तुम्ही तुमच्या प्रेम जोडीदाराला योग्य वेळ देऊ शकणार नाही. वैवाहिक जीवनात चांगले बदल दिसून येतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा अनुकूल परिणाम दिसून येऊ शकेल. बुध मिथुन राशीचा स्वामी आहे. तुमच्या मानसिक समस्या दूर होऊ शकतात. नोकरदारांना प्रभाव आणि वैभवात वाढ होऊ शकते. आयटी क्षेत्राशी निगडित लोक त्यांच्या चांगल्या कामाने उच्च अधिकाऱ्यांना प्रभावित करू शकतात. आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागू शकेल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. तुमच्या तर्कशक्‍तीत वाढ होऊ शकेल.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा उपयुक्त परिणाम दिसू शकेल. यावेळी आर्थिक लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये चांगले बदल होतील. तुमची मोठी भावंडे या काळात तुमच्यासोबत चांगला वेळ घालवू शकतात. सामाजिक कार्यात रुची वाढू शकते आणि लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा देखील या काळात सुधारू शकते. इलेक्ट्रॉनिक संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा चांगला परिणाम दिसून येऊ शकेल. काहीतरी नवीन आणि सर्जनशील करण्याची प्रेरणा देईल. नोकरदारांचा पगार वाढू शकतो. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या संदर्भात प्रवासाला जावे लागू शकेल. हे प्रवास शुभ ठरतील. आरोग्याबाबत थोडे सावध असले तरी कामाचा जास्त ताण घेतल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकता. त्यामुळे कामाच्या दरम्यान स्वतःसाठी वेळ काढा.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुध गोचराचा सकारात्मक परिणाम दिसू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करता येईल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेणार असाल तर यश तुमच्या हातात असू शकते. काही लोकांना मुलांकडून चांगली बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. जे राजकारणात आहेत, त्यांची बोलण्याची क्षमता सुधारेल आणि तुमच्या कृतीमुळे नवीन लोक तुमच्या समर्थनात उभे राहू शकतात.

सदर माहिती ज्योतिषीय मान्यता आणि सामान्य गृहीतकांवर आधारित असून, बुध गोचराचा तुमच्यावरील परिणाम जाणून घेण्यासाठी संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.