Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:50 PM2024-05-23T12:50:55+5:302024-05-23T13:02:51+5:30

Tata's Safari Review in Marathi : एवढ्या मोठ्या कारने मायलेज किती दिले, फिचर्स कशी होती, त्यांनी काम केले का... आदी सर्व गोष्टींची आम्ही टेस्ट घेतली....पहा आम्हाला कशी वाटली...

टाटाने आता खरेच कात टाकली आहे. जुन्या सफारीला नव्या जमान्याचे रुपडे देऊन सहा-सात सीटर प्रिमिअम कारच्या रेंजमध्ये एक हायटेक फिचर्स असलेली एसयुव्ही आणली आहे. भला मोठा सनरुफ, अडास आणि बरेच काही फिचर्स या कारमध्ये दिले आहेत. या सफारीसोबत आम्ही जवळपास १००० किमींची सफर केली. या दरम्यान आम्हाला ही कार कशी वाटली? एवढ्या मोठ्या कारने मायलेज किती दिले, फिचर्स कशी होती, त्यांनी काम केले का... आदी सर्व गोष्टींची आम्ही टेस्ट घेतली....पहा आम्हाला कशी वाटली...

टाटाची सफारी एसयुव्ही सहा सीटर, डिझेल कार होती. उन्हाळा आणि सहाही सीटवर प्रवासी असा हा प्रवास करण्यात आला. पहिल्या चार सीट व्हेंटिलेटेड होत्या. पाठीमागे तिसऱ्या रोमध्ये १०-१२ वर्षांची दोन-तीन लहान मुले आरामात बसू शकतात एवढी जागा आहे. तिथे एसी व्हेंटही देण्यात आलेले आहेत. शिवाय सीट बेल्ट नाही लावला तर सेन्सरही आहेत. मध्ये पायलट सीट असल्याने दोन माणसे आरामात बसू शकतात. सीटचे कंफर्ट एकदम ठीक होते. मधल्या रोसाठीही एसी व्हेंट होते.

भलामोठा सनरुफ दिलेला असल्याने रात्रीचा व सकाळचा प्रवास करायला छान वाटत होते. अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल चांगल्या प्रकारे काम करत होता. अडासमुळे समोर वाहन असेल तर त्याच्या वेगाप्रमाणे ब्रेक लागून वेग मॅच केला जात होता. लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज अलर्ट यामुळे चालकाला डुलकी लागली किंवा चुकून दुसऱ्या लेनमध्ये जात असेल तर स्टेअरिंग थोडेसे व्हायब्रेट होऊन सावध करत होते.

सुरक्षेसाठी सात एअरबॅग, सर्व सीटसाठी सीट बेल्ट सेन्सर आणि व्हॉईस वॉर्निंग आदी गोष्टी देण्यात आल्या आहेत. हार्मनची इन्फोटेन्मेंट सिस्टिम असल्याने म्युझिकचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येतो. ईझी गिअर शिफ्टरमुळे सहा स्पीडची असली तरी गिअर बदलतानाचे धक्के जाणवत नव्हते. हिल होल्ड असिस्टमुळे गाडी चढणीला थांबलेली असल्यास केसभरही मागे जात नव्हती. या सर्व गोष्टींमुळे ही एसयुव्ही चालविण्यासाठी कॉन्फिडन्स वाढण्यास मदत होत होती.

आम्ही ही कार चिखल, खडकाळ रस्ता आणि बारामती-अक्कलकोट-तुळजापूर आदी चकाचक रस्त्यांवरून चालवून पाहिली. चिखलाच्या रस्त्यावर कारची पुढील चाके काही वेळ रुतली होती. परंतु, ताकदवर इंजिनमुळे ती काही प्रयत्नातच बाहेर आली. खडकाळ रस्त्यावर आम्ही रफ मोड वापरून पाहिला. थोडे इंजिनला गुरगुरत ठेवून दबक्या आवाजात जास्त ताकद दिली जात होती. हायवेवर आम्ही बहुतांश इको मोडवरच कार चालविली. सिटीमोडवर कार जास्त पावर घेत होती.

या प्रवासादरम्यान आम्हाला संमिश्र असे १५-१६ चे मायलेज या डिझेल कारने दिले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही एसयुव्ही फुल लोडेड होती. एसी १८-१९ डीग्रीवर आणि वेगही होता. महत्वाचे म्हणजे टाकीत असलेल्या डिझेलमध्ये जेवढी कार जाऊ शकते, तेवढीच रेंज दाखवत होती. हायवेला या कारची रेंज थोडी वाढलेली दिसली. यामुळे एवढी मोठी, जड, दणकट एसयुव्हीचे मायलेज आम्हाला ठीकठाक वाटले. शहरातील ट्रॅफिकमध्ये या एसयुव्ही ८ चे मायलेज दिले.

सफारी ही नावाप्रमाणेच स्पेसिअस आहे. लांबच्या प्रवासासाठी आरामदायक वाटली. प्रत्येक सीटसाठी मोबाईल, पाण्याच्या बॉटल आणि इतर छोट्या छोट्या गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी कल्पकतेने जागा देण्यात आली आहे. अगदी पाठीमागच्या तिसऱ्या रो च्या सीटलाही मोबाईल चार्ज करण्यासाठी सॉकेट, मोबाईल ठेवण्यासाठी जागा देण्यात आली आहे. मधल्या रोच्या दरवाजांवरही मोबाईल ठेवण्यासाठी फ्लॅट सोय करण्यात आली आहे. एक कमी वाटली ती म्हणजे बुट स्पेसची. तीन्ही रोच्या सीट लावलेल्या असतील तर दोन तीन बॅकपॅक राहतील एवढीच पाठीमागे बुटस्पेस आहे. पाच जण प्रवास करणार असतील तर तुम्ही तिसरा रो सीट फोल्ड करून तिथे तुमचे सामान ठेवून प्रवास करावा लागणार आहे.

अडासने आम्हाला काही ठिकाणी जरूर आश्चर्यचकित केले. आमची कार पहिल्या लेनमध्ये होती आणि समोरील कार तिसऱ्या लेनमध्ये पुढे जात होती. उजवीकडील वळणावर कारने आम्ही आपापल्या लेनमध्ये असूनही समोर कार असल्याचे दाखवत ब्रेक मारला व त्या कारचा वेग मॅच केला. हे काहीसे धोकादायक होते. कारण पहिल्या लेनमध्ये असलेली वाहने जास्त वेगाने जात असतात. तिसऱ्या लेनमध्ये ट्रक वगैरे असेल तर त्याचा वेग कमीच असतो. अशावेळी जर पाठोपाठ वाहने असतील आणि कारने ब्रेक मारला तर मागून येणारा धडकण्याची शक्यता आहे. यामुळे या तंत्रज्ञानावर फारसे अवलंबून राहणे आम्हाला पटले नाही. बाकी क्रूझ कंट्रोलवेळी अडासने समोर वाहन सेन्स करून ब्रेक लावले, लेन चेंज करताच ओव्हरटेकसाठी परत वेग घेतला.

टाटाचा दणकटपणा, कारच्या आजुबाजुला जरी कोणी आले तरी सांगणारे सेफ्टी फिचर्स, छोट्या छोट्या गोष्टींचा स्पेसचा केलेला विचार आदी पाहता ही कार फॅमिली ट्रीपसाठी एकदम आरामदायी वाटली. मायलेजच्या बाबतीतही कारने निराश केले नाही. टीपीएमएस म्हणजे टायरचे प्रेशर सांगणारी सिस्टिम तुम्हाला मायलेज व अपघातापासून वाचण्यास मदत करते.

अशी अनेक फिचर्स तुम्हाला या कारमध्ये उपलब्ध आहेत. कुटुंबासाठी एक सुरक्षित प्रिमिअम कार म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. एसीचे भर उन्हात कुलिंग चांगले आहे. तिन्ही रोना एसी व्हेंट देण्यात आला आहे. हँडरेस्टखाली पेये थंड ठेण्यासाठी कुल्ड बॉक्स देण्यात आला आहे. एकंदरीतच ही एक चांगले पॅकेज असलेली कार वाटली.

टॅग्स :टाटाTata