कोंबडा, कासव, वाघ, कावळा, पेंग्विन यांच्याकडून मनुष्याला शिकण्याची नितांत गरज!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:20 PM2022-11-08T17:20:40+5:302022-11-08T17:24:45+5:30

८४ लक्ष योनी फिरून आत्मा मनुष्य देहात प्रवेश करतो. परंतु, आपले पूर्वजन्मीचे संस्कार विसरतो. मनुष्य म्हणून घडताना त्याने पूर्वाभ्यास केला पाहिजे आणि विशेषतः पशु पक्ष्यांना निसर्गाने जे गुण बहाल केले आहेत, ते पाहता त्याचा सदुपयोग ते कसे करतात आणि आपण त्यांच्याकडून काय शिकले पाहिजे. कसे ते जाणून घ्या!

झुंज देताना कोंबडा हार न मानता शेवट्पर्यंत लढा देतो आणि टिकून राहतो. त्याची ही झुंजार वृत्ती आपणही अंगिकारली पाहिजे. संकट आले असता आपण पटकन संयम गमावून बसतो, तसे न करता शेवट्पर्यंत आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे.

मन शांत कसे ठेवावे, हे बगळ्याकडून शिकावे. बगळा तळ्यात शांत उभा असतो. त्याची समाधी लागली आहे असे वाटून मासे त्याच्या पायाशी घुटमळतात. मात्र कोणता मासा चटकन चोचीत धरता येईल यावर तो लक्ष्य केंद्रित करतो आणि बरोबर वेळेवर चोच पाण्यात बुडवून मासा गट्टम करतो. या त्याच्या वृत्तीवरून आपणही संधीची वाट बघून संयमाने संधीचे सोने केले पाहिजे ही शिकवण मिळते.

ग्रहण काळ असो नाहीतर पृथ्वीभोवती घडणाऱ्या कोणत्याही भौगोलिक घटना असोत, कावळ्याला त्याची वर्दी आधी लागते. त्याची संवेदनशीलता इतर पशु पक्ष्यांच्या तुलनेत जास्त असते, म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनीदेखील कावळ्याला पितरांचा मान दिला असावा. तो संवेदनशील आहे तसेच सूक्ष्मदर्शीदेखील आहे. माणसाने देखील हे दोन्ही गुण शिकण्यासारखे आहेत.

वाघ एरव्ही शांत दिसतो, तरीसुद्धा त्याची दहशत कायम असते. कारण त्याच्या पंजामध्ये एवढी ताकद असते की त्याचा एक फटका सावजाला मारण्यासाठी पुरेसा असतो. तो आपली शिकार मिळवण्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी ठेवतो. मनुष्याने देखील ध्येय गाठण्यासाठी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व एवढे खुलवले पाहिजे, की लोकांच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण होईल.

ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. कासवाचे सातत्याने केलेले प्रयत्न त्याला स्पर्धेचा विजयी बनवतात. त्याच्याकडून शिकण्याची गोष्ट म्हणजे रोज थोडी थोडी प्रगती करा, हरकत नाही, फक्त त्यात सातत्य कायम ठेवा. एक दिवस विजय तुमचाच असेल.

पेंग्विन ही अतिशय जुनी प्रजाती आहे. ते बर्फाळ प्रदेशात राहतात. जलाशयातील जीवांवर त्यांची गुजराण होते, पण त्याबरोबर गरज पडली तर ते दगड खाऊनही पोट भरतात. जमिनीवर ते जरी दुडक्या चालीने चालत असले तरी पाण्यात त्यांचा वेग चौपट असतो. यावरून आपणही प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता धीराने लढण्याची तयारी दाखवली पाहिजे आणि आपल्या कार्यक्षेत्रात उतरल्यावर सूर मारण्याचे कसब अंगिकारले पाहिजे!