Makar Sankranti 2022: मकर संक्रांत: पाप-कर्तरी योगाचा ‘असा’ असेल प्रभाव; PM मोदींनी राहावे सावध; कोरोनाचा अंत जवळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:32 PM2022-01-10T18:32:02+5:302022-01-10T18:36:14+5:30

Makar Sankranti 2022: नववर्षातील पहिला सण असणाऱ्या मकर संक्रातीला जुळून येत असलेल्या योगांचा प्रभाव कसा असेल? जाणून घ्या...

इंग्रजी नववर्षात पहिला येणारा मराठी सण म्हणजे मकर संक्रांत. (Makar Sankranti 2022) मकर संक्रांतीपासून देवतांच्या दिवसांची सुरुवात होते, अशी मान्यता आहे. मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत.

मकर संक्रांतीपासून सूर्य मकरराशीत भ्रमण करू लागतो. तोपर्यंत जे दिवस थंडीने लहान झालेले असतात, ते संक्रांतीपासून तिळातिळाने वाढू लागतात. हा सण माघ शुद्ध सप्तमीपर्यंत साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांत आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीवर कोरोनाचे सावट आहे. यावर्षी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भावही वाढत आहे. देशात लसीचा बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे.

ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास यंदाची मकर संक्रांतीला विशेष योग जुळून येत आहेत. याचा देशातील कोरोना परिस्थिती, राजकारण, अर्थव्यवस्था, पाऊस, शेती यांवर मोठा प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. मेदिनी ज्योतिषात त्या त्या दिवसाची कुंडली बनवून त्याचा देशावर आणि जगावर कसा प्रभाव पडू शकेल, याचा अंदाज बांधला जातो.

आताच्या घडीला मंगळ वृश्चिक राशीत असून, केतु ग्रहाशी युतीत असल्यामुळे कोरोनाचा भारतातील प्रभाव वाढताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. आताच्या घडीला मकर राशीत बुध आणि राशीस्वामी शनी विराजमान आहेत. सूर्याच्या मकर प्रवेशानंतर सूर्य, बुध आणि शनीचा पाप-कर्तरी योग जुळून येत असून, तो शुभ नसल्याचे सांगितले जाते.

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव वाढू शकतो. मात्र, कोरोनाचा मृत्युदर कमी असेल. परंतु, या परिस्थितीचा भारतीय बाजारपेठेवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

मकर संक्रांतीला असलेल्या अन्य ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. संक्रांतीच्या कुंडलीत लग्न स्थानी असलेला चंद्र आणि दशमेतील गुरु दोन्ही ग्रह चांगले संकेत देत आहेत.

गहू आणि ऊसाचे पीक उत्तम येईल. माघ महिन्यातील पाऊस गहू पीकासाठी चांगला ठरू शकेल. मात्र, शुक्राच्या पाप-कर्तरी याोगामुळे कापूस उत्पादकांना काही नुकसान सोसावे लागू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुंडली वृश्चिक लग्नाची आहे. ही कुंडली योग्य मानली गेली, तर यानुसार, आता मंगळाची महादशेत राहुची अंतर्दशा सुरू आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी आरोग्याबाबत सावधान राहावे. तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालय एखाद्या खटल्यासंदर्भात मोठा निकाल देऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मा नामक शुभ योग रोहिणी नक्षत्रात जुळून येत आहे. महागाईतून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्यावतीने काही पावले उचलली जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.