२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:08 IST2025-12-25T17:52:28+5:302025-12-25T18:08:26+5:30
Shani Sade Sati in 2026 Effect And Impact: २०२६ या संपूर्ण वर्षात कोणत्या राशींवर साडेसाती आणि शनिचा ढिय्या प्रभाव कायम असणार आहे? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

Shani Sade Sati in 2026 Effect And Impact: २०२५ ची सांगता होत आहे आणि इंग्रजी नववर्ष २०२६ सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून २०२६ हे वर्ष अतिशय विशेष ठरणार आहे. गुरुची अतिचार गती कायम राहणार आहे. त्यामुळे २०२६ या वर्षांत गुरु मिथुन राशीत मार्गी होऊन कर्क आणि सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

२०२६ मध्ये सर्व नवग्रह नक्षत्र आणि गोचर करणार असून, यामुळे जुळून येणारे शुभ योग, राजयोग अनेक राशींना सर्वोत्तम परिणाम देणारे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह देव हा आताच्या घडीला मीन राशीत विराजमान आहे. मीन ही गुरूचे स्वामित्व असलेली रास आहे.

ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तन, राशी परिवर्तन यांचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश दुनियेवर पाहायला मिळतो. नवग्रहांमध्ये सर्वांत धीम्या पद्धतीने गोचर करणारा, परंतु, तेवढाच प्रभावी आणि नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह म्हणजे शनि ग्रह. शनि एका राशीत शनि तब्बल २.५ वर्षे असतो. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत विराजमान झाला आहे.

शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट अशी संकल्पना समाजात रुजलेली दिसते. साडेसाती शनि ग्रहामुळे येत असल्याने शनि ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीने पाहिले जाते.

नवग्रहांचा न्यायाधीश मानल्या गेलेल्या शनीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे साडेसाती. साडेसाती हा शब्द केवळ उच्चारला किंवा कानावर पडला, तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. समोरच्या व्यक्तीची साडेसाती सुरू आहे, हे समजलं की लगेचच भुवया उंचावतात. एकंदरीतच साडेसाती काळाबाबत अनेक समज, गैरसमज असल्याचे दिसून येते.

मात्र, तसे अजिबात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. शनि हा वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, नोकर, कर्मचारी, तुरुंग अशा काही गोष्टींचा कारक मानला जातो. शनि मकर आणि कुंभ या दोन राशींचा स्वामी आहे. तूळ ही शनिची उच्च रास आहे, तर मेष ही त्याची नीच रास मानली जाते. तसेच अंकशास्त्रात ८ या मूलांकावर शनिचे स्वामित्व असते.

साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व शनी यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनीचे अंशात्मक भ्रमण सुरू होते, तेव्हा साडेसाती सुरू होते. चंद्रापासून ४५ अंश पुढे शनी जाईल, तेव्हा साडेसाती संपते.

चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की, साडेसाती सुरू होते, ही पहिली अडीच वर्षे होतात. चंद्र राशीवरून शनिचे भ्रमण सुरू झाले की, दुसरे अडीच वर्षे व चंद्राच्या दुसऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरू झाली, असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणून यास साडेसाती म्हणतात.

साडेसाती योग हा शनीचा विशेषाधिकार मानला गेला आहे. शनी हा कर्मकारक आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीग्रहास दिला आहे, असे मानले जाते. साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया मानली गेली आहे.

०२ जून २०२७ रोजी शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. २९ मार्च २०२५ ते ०२ जून २०२७ हा संपूर्ण कालावधी शनि मीन राशीत विराजमान असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान होताच साडेसाती चक्र बदलले आहे. हे साडेसाती चक्र आता जून २०२७ पर्यंत कायम राहणार आहे.

आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष या ३ राशींची साडेसाती सुरू आहे. जून २०२७ पर्यंत या ३ राशींची साडेसाती कायम असणार आहे. जून २०२७ मध्ये शनिने ग्रह मेष राशीत प्रवेश केला की, कुंभ राशीची साडेसाती संपेल आणि वृषभ राशीची साडेसाती सुरू होईल.

कर्क आणि वृश्चिक या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू होता. शनिने मीन राशीत प्रवेश केल्यावर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव संपला. सध्या सिंह आणि धनू या राशींवर शनिचा ढिय्या प्रभाव/अडीचकी सुरू आहे. जून २०२७ पर्यंत या दोन राशींवरील हा ढिय्या प्रभाव कायम राहणार आहे.

२०२६ हे संपूर्ण वर्ष शनि मीन राशीत असणार आहे. त्यामुळे साडेसातीचे चक्र बदलणार नाही. तसेच अडीचकी प्रभावही तसाच कायम राहणार आहे. त्यामुळे निराश न होता आपले काम प्रामाणिकपणे, समर्पणाने आणि सच्चेपणाने करावे. आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवावा, असे म्हटले जात आहे.

ज्यांची साडेसाती सुरू आहे किंवा शनिचा ढिय्या प्रभाव आहे, अशा लोकांनी आवर्जून न चुकता शनि संबंधातील उपाय, शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टींचे नक्कीच पालन करावे. २०२६ या वर्षांत संकल्प करून ते पाळण्याचा प्रयत्न करावा, असे केल्यास शनि कृपा सदैव राहू शकेल, असे सांगितले जात आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















