Janmashtami 2022: महाभारतावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते? बाळकृष्णांची रास काय? पाहा, जन्माष्टमीचे अद्भूत योग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:59 AM2022-08-17T06:59:26+5:302022-08-17T07:05:16+5:30

Janmashtami 2022: श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांनी आपल्या अवतारकार्याची सांगता कितव्या वर्षी केली? जाणून घ्या, आश्चर्यकारक तथ्ये...

श्रीकृष्णाचे नाव घेतले की, जसे गोकुळ, राधा, बाळकृष्णाच्या लीला आठवतात, तसे श्रीकृष्णाचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना त्याच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांची आठवण काढली जाते. यंदा १८ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. (janmashtami 2022)

भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील प्रत्येक संकटावर युक्तीने, बुद्धिचातुर्याने आणि वेळेप्रसंगी अन्य व्यक्तींच्या सहकार्याने कशी मात करावी, ते शिकविले. महाभारताचा हा महानायक, भागवतपुराण तर कितीही वेळा पारायणे केली तरीही त्याच्या आठवणी जागविण्यातील आनंद घेण्याचा मोह होतो. गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेता घेता उभे आयुष्य कमी पडते असा याचा महिमा. (sri krishna zodiac sign)

श्रावण महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीविष्णूंनी आठवा अवतार कृष्णावतार धारण केला होता. ज्योतिषीय गणना आणि पुराणातील काही माहितीनुसार कृष्णाचा जन्म अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्र आणि लग्न स्थान वृषभ असताना झाला. त्यावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान होता. एकंदरीत या ग्रहमानामुळे श्रीकृष्णांची रास वृषभ असल्याचे सांगितले जाते. (shri krishna age during mahabharata)

महाभारत युद्ध तब्बल अठरा दिवस चालले. अनेक वीर योद्धे यावेळी कामी आले. हातात शस्त्र न घेताही मुसद्देगिरी आणि नेमक्या धोरणांनी पांडवांना महाभारताच्या विजयश्रीपर्यंत श्रीकृष्णांनी नेले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा कौरव आणि पांडवांच्या बाजूने कोण होते? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्णांचे वय किती होते? एकूण किती वर्ष श्रीकृष्ण जगले? जाणून घेऊया... (amazing facts of sri krishna janmashtami)

महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी आपल्या सेनेचा तळ कुरुक्षेत्राच्या पश्चिम क्षेत्रात सरस्वती नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या समंत्र पंचक तीर्थाच्या जवळ हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावर टाकला. कौरवांनी कुरुक्षेत्राच्या पूर्व भागात तिथून काही योजने दूर एका सपाट मैदानावर आपला तळ टाकला. दोन्ही शिबिरात सैनिकांचे भोजन आणि जखमी सैनिकांच्या इलाजाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

हत्ती, घोडे आणि रथांची वेगळी व्यवस्था होती. हजारो शिबिरांपैकी प्रत्येक शिबिरात मुबलक प्रमाणात खाद्य सामग्री, अस्त्र-शस्त्र, यंत्र आणि अनेक वैद्य आणि शिल्पी वेतन देऊन ठेवण्यात आले होते. दोन्ही सैन्यात युद्धासाठी ५ योजने ४० किलोमीटरचा घेरा मोकळा ठेवण्यात आला होता. या सर्वांचे व्यवस्थापन श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते, असे सांगितले जाते.

तब्बल अठरा दिवसांनंतर महाभारत युद्ध अखेरीस शमले. यात पांडव पक्षाचा विराट आणि विराट पुत्र उत्तर, शंख आणि श्वेत, सत्याकीचे १० पुत्र, अर्जुनाचा पुत्र इरावात, द्रुपद, द्रौपदीचे ५ पुत्र, धृष्टद्युम्न, कौरव पक्षाचे कलिंगराज भानुमान, केतुमान, अन्य कलिंग वीर, प्राच्य, सौवीर, क्षुद्रक आणि मालव वीर, कौरवांच्या बाजूने धृताराष्ट्राचे दुर्योधनासह सर्व पुत्र, भीष्म, त्रिगर्त नरेश, जयद्रथ, भगदत्त, द्रौण, दुःशासन, कर्ण, शल्य इत्यादी सर्व युद्धात मारले गेले.

महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३ आणि पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते. यापैकी कौरवांकडून कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा; तर, पांडवांकडून युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी आदी जिवंत राहिले. युयुत्सु हा कौरव पांडवांच्या बाजूने लढल्यामुळे तो एकच कौरव म्हणून जिवंत राहिला. बाकी सर्व कौरव युद्धात मारले गेले.

महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्धावेळी अगदी चोख बजावल्या. एका संशोधनानुसार महाभारत युद्ध झाले, त्यावेळी श्रीकृष्ण ८९ वर्षांचे होते, असे सांगितले जाते.

महाभारत युद्धाच्या तब्बल ३६ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते. ज्योतिषीय माहितीनुसार, कलियुगाचा आरंभ शक संवतच्या पूर्वी ३१७६ वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला झाला होता. आत्ता शके १९४२ आहे. कलियुगाची सुरुवात होण्यापूर्वी ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, असे सांगितले जाते.