शनि काय, कोणतेच संकट येऊ देत नाहीत हनुमंत; ‘या’ ४ राशी आहेत अत्यंत प्रिय, अपार कृपा लाभते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:38 IST2025-04-11T15:20:09+5:302025-04-11T15:38:13+5:30

Hanuman Jayanti Janmotsav April 2025: बुद्धी, शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा परम आदर्श असणाऱ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो. ज्यांची साडेसाती सुरू आहे, त्यांनी नेमके काय करावे?

Hanuman Janmotsav April 2025: मनोजवं मारुततुल्यवेगमं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।। अशा बुद्धी, शक्ती, युक्ती आणि भक्ती यांचा अद्भूत संगम आणि अनेकविध गोष्टींचा परम आदर्श असणाऱ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव देशभरात अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदा, १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जन्मोत्सव आहे.

हनुमान हा श्रीरामांचा निससीम भक्त असल्याच्या कथा वाल्मिकी रामायणात आढळतात. हनुमंत चिरंजीव मानले गेले आहेत. हनुमंतांचे नुसते नाव घेतले तरी शक्ती संचारल्यासारखे वाटते. प्रभू श्रीरामांचे परमभक्त, शक्ती अन् सामर्थ्याचे दैवत मानल्या गेलेल्या हनुमान, बजरंगबलीचे देशभरात पूजन केले जाते. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शनिवारही आहे. सुमारे १०० वर्षांनी विविध प्रकारचे योग जुळून येत असल्याचा दावा केला जात आहे.

समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाची उपासना महाराष्ट्रात पोहोचविली. ११ विविध ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन करून उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याच्या उपासना याचे महत्त्व प्रस्थापित केले. रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते. उत्तर भारतात हनुमानाची उपासना प्रसिद्ध आहे. तुलसीदास विरचित हनुमान चालिसा उत्तर भारतात विशेष लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात सामान्यपणे शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीच्या पूजेचे वार मानले जातात.

अशा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. मीन राशीत पंचग्रही, लक्ष्मी नारायण योग, बुधादित्य, शुक्रादित्य, मालव्य राजयोग तयार होत आहेत. यासोबतच चंद्र कन्या राशीत राहील. गुरु ग्रह वृषभ राशीत असल्याने चंद्रावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. तसेच याच कन्या राशीत असलेल्या केतुशी चंद्राचा युती योग जुळून येत आहे.

मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. ही रास हनुमंतांची प्रिय रास असल्याचे मानले जाते. हनुमानाची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे सांगितले जाते. अशा व्यक्तींमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, लक्ष्य केंद्रित करण्याची क्षमता असते. बजरंगबली त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असतात. कौशल्य, ज्ञान आणि चतुराईने पैसे कमवू शकतात. या राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानाचे पूजन करावे, असे केल्याने संकटे दूर होण्यास मदत मिळू शकते. सुख, सौभाग्य, ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. ही रास हनुमानाची प्रिय रास असल्याचे म्हटले जाते. मारुतीरायाची विशेष कृपा या राशीच्या व्यक्तींवर असते, असे सांगितले जाते. जीवनातील समस्यांपासून बजरंगबली संरक्षण करतात. हनुमानाच्या कृपेने पैशांचा ओघ सुरू राहतो. पैशाची कमतरता भासत नाही. या व्यक्ती करिअर आणि व्यवसायात प्रगती करू शकतात. या व्यक्तींना हनुमंतांच्या कृपेने विशेष लाभ होतो. नेतृत्व क्षमता वाढीस लागते, असे म्हटले जाते. हनुमानाचे पूजन केल्याने या राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे.

वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींवर हनुमंतांची विशेष कृपा असते. हनुमानाच्या कृपेने या राशीचे लोक त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात. हनुमानाच्या कृपेने कामे यशस्वी होऊ शकतात. ती फलदायी ठरू शकतात. या लोकांना हनुमानाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. तसेच, आर्थिक स्त्रोतांच्या कमतरतेचा फटका बसत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कुंभ: या राशीचा स्वामी शनि आहे. या राशीच्या लोकांवर विशेष हनुमंतांचा आशीर्वाद असतो. आताच्या घडीला कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. या राशीच्या व्यक्तींना हनुमान अतिरिक्त लाभ देतात. कामात भरघोस भरभराट करतात. अडथळ्यांपासून मुक्तता होऊ शकते. आनंदी, समृद्ध जीवन जगतात. आर्थिक स्थितीही अनुकूल असते. या राशीच्या व्यक्तींनी नियमितपणे हनुमानाची पूजा केली तर, शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तसेच सिंह राशीवर ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. तर, सिंह राशीवर ढिय्या प्रभाव सुरू झाला. जून २०२७ ला कुंभ राशीची साडेसाती आणि सिंह राशीवर ढिय्या प्रभाव संपणार आहे.

शनी हा कर्मकारक आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीग्रहास दिला आहे, असे मानले जाते. ज्याच्यामुळे साडेसाती येते, तो शनी ग्रह असला, तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे. शनि हा सूर्यपुत्र मानला जातो. शनी हा नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह आहे. शनि वाईट काहीच करत नाही. उलट, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे देतो, असे म्हटले जाते.

जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना तो उच्च शिखरावर नेऊन बसवतो. साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू असलेल्यांसाठी हनुमंतांशी निगडीत काही उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते.

हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत, असे सांगितले जाते. रामायण काळात रावणाच्या तावडीतून शनिला हनुमंतांनी सोडवले होते, अशी एक कथा प्रचलित आहे.

या कारणामुळे हनुमंतांचे नियमित पूजन, उपासना, नामस्मरण केल्यास शनि त्रास देत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. हनुमानाला महादेवांचाच अंश मानले जाते, महारुद्र मानले जाते.

म्हणूनच या प्रिय राशीपैकी ज्यांना शनि साडेसाती किंवा शनिचा ढिय्या प्रभाव आहे, त्यांनी अगदी संकल्प करावा आणि १२ एप्रिल २०२५ या हनुमान जन्मोत्सवापासून हनुमंतांची सेवा सुरू करावी. यशाशक्ती करावी. मनापासून करावी, असे सांगितले जात आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.