दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:12 IST2025-10-21T13:59:49+5:302025-10-21T14:12:20+5:30
Diwali Padwa 2025: दिवाळी अगदी उत्साहात साजरी होत आहे. दिवाळी पाडवा, बालिप्रतिपदा, भाऊबीज हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? धनलक्ष्मीची कृपा कोणत्या राशींवर असेल? जाणून घ्या...

Diwali Padwa 2025: संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे. विविध प्रकारच्या खरेदीसाठी बाजारपेठा तुडूंब भरल्या आहेत. लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा साजरे होत आहेत. बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आहे.
या दिवशी कार्तिक मासारंभ होणार असून, गोवर्धन पूजन केले जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे.
बलिप्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक मानला जातो. या दिवशी बळीची पूजा करावयाची असते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते. यानंतर भाऊबीज साजरी होईल. दिवाळीचा कालावधी अनेक राशींना सर्वोत्तम फले देणारा ठरणार असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया...
मेष: एखादी इच्छा पूर्ण होईल. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. मनातील काळजीचे विचार झटकून टाका. त्यामुळे दिवाळीचा आनंद लुटता येईल. जवळच्या नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. लोकांना आश्वासने देऊन शब्दात अडकू नका.
वृषभ: विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. अति आत्मविश्वास बाळगू नका. स्पर्धा परीक्षा देत असाल तर अनुकूल फळे मिळतील. मुलांचे कौतुक होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. त्यामुळे फायदा होईल. विविध प्रकारच्या कामांचा ताण राहील. प्रत्येकावर भरवसा ठेवून चालणार नाही. चवदार पदार्थ समोर येतील; पण पोट बिघडेल एवढा ताव त्यावर मारू नका. शुक्रवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल.
मिथुन: नवीन ओळखी होतील. कार्यक्षेत्रात प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होऊन मन प्रसन्न होईल. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या. त्यांच्याशी संवाद ठेवा. शुक्रवार, शनिवार उत्साहाच्या भरात लोकांना योजना सांगू नका. तब्येतीला जपा.
कर्क: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. कुणी काही योजना सांगितल्या, तर हुरळून जाऊन चटकन निर्णय घेऊ नका. नातेवाइकांशी वाद होणार नाही, याची काळजी घ्या. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. त्यामुळे मन आनंदून जाईल.
सिंह: धनलक्ष्मीची कृपा राहील. जे-जे ठरवाल ते-ते सिद्धीस जाईल. ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. मात्र, त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. आरोग्य चांगले राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. प्रवासात थोडी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत नवीन संधी मिळेल.
कन्या: अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. थोडा विचार करून निर्णय घ्यावा. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा.
तूळ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. हातून बराच पैसा खर्च होईल. खरेदीत फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. काही कायदेविषयक अडचणी असतील. मात्र, लवकरच त्यातून बाहेर याल. ओळखीचे फायदे होतील. उत्तरार्धात ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. आर्थिक लाभ होतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.
वृश्चिक: दिवाळी साजरी करण्यात प्रसन्नता राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे मन आनंदून जाईल. मात्र, काही अडचणी येतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जवळच्या लोकांशी गैरसमज होऊ शकतात. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. घाईघाईत कामे करू नका. वाहने जपून चालवा. शुक्रवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल.
धनु: पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात एखादी आनंदाची घटना घडेल. आर्थिक स्तर उंचावलेला असेल. घरात मंगलमय वातावरण राहील, आर्थिक आवक चांगली असली तरी व्यवहारात सावधानता बाळगणे आवश्यक आहे. आपले पत्ते लोकांसमोर उघड करून दाखवण्याचा मोह आवरा. कुणी हातोहात फसवू शकते. दगदग टाळा. मनावर ताण राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील.
मकर: चंद्राचे भ्रमण दिवाळीचा आनंदोत्सव अधिकच द्विगुणित करणारे ठरेल. चांगली बातमी कळेल. त्यामुळे मनात उत्साह राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. समाजात मान वाढेल. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र, मुत्सद्दीपणाने वागले पाहिजे. कठोर शब्द वापरून लोकांना नाराज करू नका.
कुंभ: दिवाळी आरामात साजरी करता यावी यासाठी कामे आटोपून टाकण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे दगदग होईल. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. परिस्थिती आटोक्यात येईल. मात्र, सामाजिक कार्यासाठी बराच वेळ द्यावा लागेल. कितीही कामे केली तरी काही लोक कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ द्यावा.
मीन: अनुकूलता अनुभवायला मिळेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. त्यामुळे दिवाळी चांगली जाईल. काही अडचणी येतील. इतरांच्या भानगडीत पडू नका. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. घाईगडबडीत कामे करू नका. शुक्रवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.