Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:38 IST2026-01-08T15:29:13+5:302026-01-08T15:38:22+5:30
Chanakya Niti for Personality: आपल्या आजूबाजूला असे लोक असतात जे चारचौघात भाव खाऊन जातात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काय वेगळेपण असते याचा कधी विचार केलाय का? हे वेगळेपण तुम्हालाही निर्माण करायचे असेल आणि लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवून घ्यायची असेल तर चाणक्यनीतीचे ५ नियम पाळा.

आचार्य चाणक्य म्हणतात की, मनुष्याचे व्यक्तिमत्व हे केवळ त्याच्या रूपावर नाही, तर त्याच्या वागण्यावर आणि विचारांवर अवलंबून असते. आजच्या जगात स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करायचे असेल तर चाणक्य नीतीचे पुढील नियम अंगिकारावेच लागतील.

१. मौनाचे सामर्थ्य (Power of Silence)
'कमी बोलणे ही ताकद आहे'. चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती आवश्यक तेवढेच बोलतो, त्याचे शब्द मौल्यवान ठरतात. जास्त बोलल्यामुळे माणूस स्वतःची गुपिते उघड करतो किंवा चुकीचे शब्द बोलून बसतो. तुम्ही जितके शांत राहाल, तितके लोक तुमच्या विचारांबद्दल उत्सुक राहतील. मौन हे शहाणपणाचे लक्षण आहे आणि ते तुमची शक्ती वाढवते.

२. स्वतःचे मूल्य जपा (Value Yourself)
'हर जगह मौजूद रहो, पर सबके साथ नहीं'. चाणक्य सांगतात की, एखाद्या ठिकाणी वारंवार गेल्याने किंवा प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध झाल्याने माणसाची किंमत कमी होते. ज्याप्रमाणे चंदनाची किंमत त्याच्या दुर्मिळतेमुळे असते, तसेच तुमच्या उपस्थितीचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोणासोबत आणि कुठे वेळ घालवता हे महत्त्वाचे आहे. प्रत्येकासाठी उपलब्ध असणे तुम्हाला 'स्वस्त' बनवते.

३. देहबोली आणि आत्मविश्वास (Body Language)
चाणक्य नीतीमध्ये आत्मविश्वासाला सर्वात मोठे शस्त्र मानले गेले आहे. तुमची चालण्याची ढब आणि बोलण्याचा आत्मविश्वास तुमची निम्मी लढाई जिंकून देतो. ताठ छाती आणि स्थिर नजर हे एका पराक्रमी आणि स्पष्ट विचारांच्या माणसाचे लक्षण आहे. जेव्हा तुमची देहबोली प्रभावी असते, तेव्हा शत्रूही तुमचा आदर करण्यास भाग पडतो. तुमच्या शरीराची हालचाल तुमच्या मनातील ताकद दर्शवते.

४. गुपित राखा (Keep Your Plans Private)
'हर चीज मत बताओ, हर प्लान मत खोलो'. चाणक्य नीतीमधील सर्वात प्रसिद्ध सूत्र म्हणजे— आपले नियोजित कार्य कधीही कोणाला सांगू नका, ते पूर्ण झाल्यावरच जगाला दिसू द्या. तुमच्याबद्दल थोडी गूढता (Mystery) कायम ठेवा. जे लोक स्वतःचे सर्व पत्ते आधीच उघड करतात, त्यांना हरवणे सोपे जाते. लोकांना तुमच्याबद्दल सर्व काही माहित नसावे, तरच तुमचे आकर्षण टिकून राहते.

५. स्वाभिमान आणि स्वतःचा आदर (Self-Respect)
'खुद की नजरों में Legend बनो'. चाणक्य म्हणतात की, ज्याला स्वतःची किंमत माहित नाही, त्याला जग काय किंमत देणार? जेव्हा तुम्ही इतरांकडून मान्यतेची (Approval) अपेक्षा करणे सोडून देता, तेव्हा तुमचा खरा प्रभाव निर्माण होतो. स्वतःच्या नजरेत स्वतःला श्रेष्ठ बनवा आणि स्वतःच्या तत्त्वांवर जगा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक होते.

















