दिवेलागणीच्या वेळी 'या' गोष्टी आवर्जून टाळा अन्यथा दुर्भाग्य येईल घरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:26 PM2022-01-05T12:26:08+5:302022-01-05T12:31:50+5:30

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गाणे आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. पूर्वी दिवे लागणीच्या वेळी म्हणजेच सातच्या आत घरात येण्याची शिस्त होती. परंतु आता सगळेच जण काहींना काही कारणाने, कामाने सायंकाळी ७ नंतर बाहेर पडतात, उशिरा घरी येतात. कारण कार्यपद्धती बदलली. अशा काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसल्या तरीदेखील ज्या गोष्टी आपण डोळसपणे करू शकतो, त्यासाठी आपण नक्कीच आग्रह धरला पाहिजे.

अशी अनेक कामे शास्त्रात सांगण्यात आली आहेत, जी केल्याने घरात समृद्धी राहते. त्याचबरोबर अशी काही कामे आहेत जी सूर्यास्तानंतर करू नयेत. आपल्या आजी आजोबांकडून आपण अशा अनेक गोष्टी आजवर ऐकल्या असतील. कालौघात आपण त्या विसरत चाललो आहोत. परंतु त्या गोष्टींचा आपल्या वास्तूवर थेट विपरीत परिणाम होऊ शकतो.

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याच्या आयुष्यात कधीही धन-संपत्तीची कमतरता भासू नये. यामुळेच लोक कष्ट करतात. पैसा मिळवणे हे अवघड काम आहे, पण ते टिकवणे त्याहूनही कठीण आहे. अशी अनेक कामे शास्त्रात सांगण्यात आली आहेत, जी केल्याने घरात समृद्धी राहते. तसेच काही गोष्टी आहेत ज्या सूर्यास्तानंतर करू नयेत. त्यामुळे आर्थिक अडचणी आणि दुर्भाग्य पाठ सोडत नाही. अशा स्थितीत सूर्यास्तानंतर कोणती कामे निषिद्ध आहेत हे ते जाणून घेऊ.

सायंकाळी झाडांना हात लावू नये कारण ती झोपतात असा संस्कार बालपणापासून आपल्यावर घालण्यात आला आहे. वास्तुशास्त्र या विचाराला जोड देत सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये असे सांगते. तसेच सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी देणेही निषिद्ध आहे. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श केल्यास किंवा तोडल्याने लक्ष्मी मातेची अवकृपा होते. त्यामुळे घरात पैशांची कमतरता निर्माण होते आणि दारिद्रय घराचे दार ठोठावते.

शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घरातून कोणालाही दही देणे वर्ज्य आहे. वास्तविक दही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. तसेच शुक्र हा धन आणि वैभवाचा दाता मानला जातो. अशा स्थितीत सूर्यास्तानंतर कोणालाही दही दिल्याने सुख-समृद्धी कमी होते. याशिवाय आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी सायंकाळी मीठ देऊ नये, पैशांची देवाण घेवाण करू नये असेही सांगितले जाते.

सूर्यास्ताच्या वेळी झोपणे निषिद्ध मानले जाते. याशिवाय सूर्यास्ताच्या वेळी अन्न खाऊ नये. सूर्यास्ताच्या वेळी ही दोन कामे केल्याने धनहानी होते. यासोबतच मानसिक त्रासही होतो. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी पूजा करता येते. अलीकडे प्रत्येक डाएट प्लॅनमध्ये सुद्धा सूर्यास्ताच्या आधी जेवून घ्या असे सांगितले जाते, सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर नाही.

सूर्यास्ताच्या वेळी घरात झाडू, साफसफाई करणे अशुभ मानले जाते. सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास आर्थिक नुकसान होते. त्याच वेळी लक्ष्मी घराघरात डोकावत असते. अशा वेळी आपण साफ सफाई करण्यात दंग राहिलो तर लक्ष्मी आल्या पावली निघून जाईल. म्हणून सूर्यास्ताच्या आधी साफ सफाई करून घ्यावी. त्याचप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर नखे किंवा केस कापणे हे देखील याच कारणासाठी गैर मानले जाते.