कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:19 IST2025-11-10T14:12:18+5:302025-11-10T14:19:03+5:30
भारतात अनेक चालक 'इमर्जन्सी लाइट्स'चा चुकीचा वापर करतात; धुक्यात किंवा बोगद्यात वापरल्यास वाढतो धोका.

रस्त्यांवरील सुरक्षितता हा विषय नेहमीच महत्त्वाचा असतो. कारमधील अनेक फीचर्स तुमच्या सुरक्षिततेसाठी बनवलेले असतात, त्यापैकीच एक आहे 'हेजर्ड लाइट्स', ज्यांना अनेकदा 'इमर्जन्सी लाइट्स' किंवा 'पार्किंग लाइट्स' म्हणूनही ओळखले जाते.

भारतात अनेक चालक या लाइट्सचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी अपघात होण्याचा धोका वाढतो. या लाइट्सचा योग्य वापर कधी करावा आणि कधी नाही, हे जाणून घेणे प्रत्येक ड्रायव्हरसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

या परिस्थितीत 'हेजर्ड लाइट्स' नक्की लावा:
'हेजर्ड लाइट्स' (ज्यात एकाच वेळी कारच्या चारही दिशादर्शक लाइट्स एकसारख्या चमकतात) चा वापर केवळ आणीबाणीच्या परिस्थितीत केला जावा, जेव्हा तुमची कार इतरांसाठी धोका निर्माण करत असेल.

कारमध्ये बिघाड झाल्यास
रस्त्यात अचानक कार बंद पडल्यास, टायर पंक्चर झाल्यास किंवा कोणताही तांत्रिक बिघाड झाल्यास. ही लाइट्स इतर चालकांना सूचित करतात की तुमचे वाहन स्थिर आहे आणि रस्त्यावर समस्या निर्माण झाली आहे.

अपघात झाल्यास
अपघात झाल्यावर तुमची कार रस्त्यावर उभी असल्यास किंवा रस्त्याच्या भागाला अडथळा निर्माण करत असल्यास, तात्काळ हेजर्ड लाइट्स चालू करा. यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना वेळेत सावधगिरी बाळगता येते.

टोईंग करताना
जेव्हा तुमची कार टो करून (ओढून) नेली जात असते, तेव्हा हेजर्ड लाइट्स चालू ठेवणे अनिवार्य आहे, कारण तुमचे वाहन स्वतःहून कार्यरत नाही, असा स्पष्ट संदेश यामुळे मिळतो.

या परिस्थितीत 'हेजर्ड लाइट्स' वापरणे टाळा:
अनेक चालक हेजर्ड लाइट्सचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात, ज्यामुळे समोरच्या चालकामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.

दाट धुक्यात किंवा जोरदार पावसात
अनेकजण धुक्यात किंवा मुसळधार पावसात हेजर्ड लाइट्स लावतात. हा नियमबाह्य आणि धोकादायक वापर आहे. यामुळे मागून येणाऱ्या चालकाला तुमची कार 'चालू' आहे की 'थांबलेली' हे कळत नाही. अशा परिस्थितीत केवळ फॉग लॅम्प्स आणि लो-बीम हेडलाइट्सचा वापर करावा.

बोगद्यातून जाताना
बोगद्यातून जाताना हेजर्ड लाइट्स लावू नयेत. बोगद्यात केवळ हेडलाइट्स चालू ठेवाव्यात.

ओव्हरटेक करताना/ सरळ जाताना
ओव्हरटेक करताना किंवा सरळ रस्त्यावर जाताना हेजर्ड लाइट्स लावून, 'धन्यवाद' वगैरे सिग्नल देणे टाळा. हे दिशादर्शक लाइट्सचा गैरवापर आहे, ज्यामुळे इतर चालकांना गोंधळ होतो.

















