नवीन अवतारात लॉन्च झाली TVS Raider; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 19:08 IST2025-08-26T19:01:52+5:302025-08-26T19:08:16+5:30
TVS ने आपल्या लोकप्रिय Raider चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे.

TVS Raider: भारतातील आघाडीची टू-व्हिलर उत्पादक कंपनी TVS ने त्यांच्या लोकप्रिय कम्युटर बाईक Raider चे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने रेडरसाठी सुपर स्क्वॉड लाइनअपमध्ये डेडपूल आणि वुल्व्हरिन एडिशन लॉन्च केले आहेत. यापूर्वी, टीव्हीएसने एनटॉर्कसाठी सुपर स्क्वॉड लाइनअपमधील कॅप्टन अमेरिका एडिशन लॉन्च केले होते.
नावाप्रमाणेच रेडरचे नवीन स्पेशल एडिशन मॉडेल मार्वलच्या एक्स-मेन सुपरहिरो डेडपूल आणि वुल्व्हरिनपासून प्रेरित आहे. मार्वलचे चाहते असलेल्या तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन हे नवीन एडिशन डिझाइन केले आहे.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या डेडपूल अँड वुल्व्हरिन चित्रपटात ही दोन्ही पात्रे दिसली होती, ज्यामध्ये डेडपूलची भूमिका रायन रेनॉल्ड्सने केली होती आणि वुल्व्हरिनची भूमिका ह्यू जॅकमनने केली होती.
रेडरच्या दोन्ही स्पेशल एडिशन मॉडेल्सची किंमत ९९,४६५ रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून दोन्ही स्पेशल एडिशन देशभरातील सर्व डीलरशिपवर उपलब्ध असतील.
रेडरच्या सुपर स्क्वॉड एडिशनला अनेक बदलांसह खास बनवण्यात आले आहे. त्यात आयजीओ असिस्ट आणि बूस्ट मोड मिळेल, ज्यामुळे पिकअप जलद होतो. शिवाय, ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी (जीटीटी) देखील आहे, ज्यामुळे बाईक कमी वेगाने सुरळीत चालते आणि चांगले मायलेज देखील देते.
बाईकच्या खास वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, आयएसजी सायलेंट स्टार्ट सिस्टम (आवाजाशिवाय स्टार्ट), साइड स्टँड इंडिकेटर आणि इंजिन कट-ऑफ, पूर्णपणे कनेक्टेड रिव्हर्स एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट, मेसेज नोटिफिकेशन, लो फ्युअल इंडिकेशन, व्हॉइस असिस्ट मिळेल.
शिवाय, इको, पॉवर आणि बूस्ट असे ३ राइड मोड आहेत. यात १२४.८ सीसी इंजिन आहे. ही बाईक फक्त ५.८ सेकंदात ० ते ६० किमी/ताशी वेग गाठू शकते. बाईकचे मायलेज सुमारे ५५ किमी आहे.