केवळ ६३०० रुपयांच्या EMI मध्ये घरी न्या KTM ची जबरदस्त बाईक; Adventure बाईक लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 03:43 PM2022-01-15T15:43:47+5:302022-01-15T15:55:56+5:30

2022 KTM 250 अॅडव्हेन्चर बाईक कंपनीनं केली लाँच.

KTM इंडियानं 2022 चं मॉडेल KTM 250 अॅडव्हेन्चर मोटरसायकल लाँच केली आहे. ही बाईक KTM इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि KTM फॅक्ट्री रेसिंग ब्लू या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

या बाईकची देशभरातल्या KTM डीलरशीपद्वारे विक्री केली जाणार आहे. दरम्यान, केवळ 6300 रुपयांच्या महिन्याच्या EMI वर ही बाईक खरेदी करता येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.

तरुण वर्गामध्ये अॅडव्हेचर बाईक्सची वाढती मागणी पाहता कंपनीनं ही बाईक लाँच केली आहे. या बाईकची स्पर्धा रॉयल एनफिल्ड हिमालयन, हीरो एक्सपल्स 200 आणि BMW G310 GS सोबत असेल.

लांब पल्ल्याच्या राईडसाठी कंपनीनं ही नवी बाईक तयार केली आहे. ही बाईक KTM 390 प्लॅटफॉर्मवरच तयार करण्यात आली आहे. नवीन बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, 14.5-लिटर फ्युअल टँक, डिजिटल डिस्प्ले, स्प्लिट सीट, स्किड प्लेट्स, एलईडी टेललाइट देण्यात आले आहेत.

कंपनीने बाईकसोबत ब्लॅक अलॉय व्हिल्स दिले आहेत. या क्वार्टर-लिटर मोटरसायकलमध्ये 248 cc DOHC इंजिन आहे जे 30 PS पॉवर आणि 24 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञानासह हे शक्तिशाली इंजिन सादर केले आहे.

कोणत्याही रस्त्यावर धावण्यासाठी बाइकला 200 mm चा ग्राऊंड क्लिअरन्स दिला आहे. याला पुढील बाजूस 19-इंच आणि मागील बाजूस 17-इंचाचे व्हिल्स देण्यात आले आहेत. तसंच ही ट्यूबलेस टायरसह येतात.

या बाईकमध्ये पुढील बाजूस 320 मिमी आणि मागील बाजूला 230 मिमी डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. हे ड्युअल-चॅनल एबीएससह येते. बाईकच्या पुढील बाजूस 170 mm USD फोर्क्स आणि मागील बाजूस 177 mm सस्पेंशन देण्यात आलं आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.35 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आलीये.