अखेर प्रतीक्षा संपली; OLA S1 Electric Scooter झाली लाँच, 181Kmsची रेंज; पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 03:52 PM2021-08-15T15:52:23+5:302021-08-15T16:00:17+5:30

Ola S1 Electric Scooter: स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधून OLA नं लाँच केली आपली पहिली Electric Scooter. गुजरातमध्ये सर्वात कमी किंमत, पाहा महाराष्ट्रात किती.

Ola S1 Electric Scooter: देशातील प्रमुख कॅब सेवा पुरवणारी कंपनी Ola नं रविवारी स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देशांतर्गत बाजारात आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर Ola S1 लाँच केली.

गेल्या अनेक दिवसांपासून बरेच जण या इलेक्ट्रीक स्कूटरच्या प्रतीक्षेत होतं. परंतु अखेर कंपनीनं यावरून पडदा उठवला. कंपनीनं ही स्कूटर दोन व्हेरिअंट S1 आणि S1 Pro मध्ये लाँच केली आहे.

भारतीय बाजारपेठेत Ola S1 ची किंमत 85,099 रूपये, तर Ola S1 Pro ची किंमत 1.10 लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत दिल्लीनुसार देण्यात आली आहे. यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून देण्यात आलेल्या दोन्ही किंमतींचा समावेश करण्यात आला आहे.

या इलेक्ट्रीक स्कूटरची सर्वात कमी किंमत ही गुजरात मध्ये आहे. या ठिकाणी Ola S1 या मॉडेलची किंमत 79,999 रूपये इतकी आहे. तर Ola S1 Pro या मॉडेलची किंमत 109999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात या स्कूटरच्या Ola S1 या व्हेरिअंटची किंमत 94,999 रूपये आणि Ola S1 Pro या व्हेरिअंटची किंमत 1,24,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये Ola S1 व्हेरिअंटची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रूपये इतकी निश्चित करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

ओलानं आपल्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये जबरदस्त फीचर्स सामिल केले आहे. तसंत हे फीचर्स सध्या देशात उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्कूटरमध्ये पाहायला मिळत नाही.

कंपनीनं या स्कूटरमध्ये आर्टिफिशिअल साऊंड सिस्टम दिला आहे. तुम्ही आपल्या मर्जीनुसार स्कूटरचा साऊंड बदलू शकता. तसंच कंपनीनं यामध्ये 4G कनेक्टिव्हीटीही दिली आहे. याच्या मदतीनं तुम्ही सतत इंटरनेटशी कनेक्ट राहू शकता.

तुम्ही आपल्या स्मार्टफोनच्या मदतीनं या स्कूटरचे अनेक फीचर्स ऑपरेट करू शकता. यामध्ये स्कूटर लॉक आणि अनलॉक करण्याच्या फीचरचाही समावेश करण्यात आला आहे.

याद्वारे तुम्ही केवळ 'Hey Ola' असं म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही आपल्या स्कूटरवर आवडतं गाणं ऐकण्यासोबतच जीपीएस नेव्हीगेशन किंवा कोणालाही कॉल करण्यासारखी कामही करू शकता. यामध्ये सात इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले आणि स्पीकरही देण्यात आला आहे.

इतकंच नाही तर ही स्कूटर तुमचा आवाजही ओळखू शकते. यामध्ये व्हॉईस कमांड सिस्टमही देण्यात आला आहे.

Ola च्या इलेक्ट्रीक स्कूटरला लॉक अनलॉक करण्यासाठी चावीची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला आपला स्मार्टफोन स्कूटरशी कनेक्ट करावा लागेल. त्यानंतर मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्कूटर लॉक अनलॉक करू शकता.

इतकंच नाही तर या स्कूटरमध्ये एक सेन्सरही देण्यात आला आहे. तुम्ही स्कूटरच्या जितकं जवळ असाल तशी ही स्कूटर आपोआप अनलॉक होईल आणि तुम्ही सेन्सरच्या रेंजपेक्षा दूर गेलात तर तुमची स्कूटर आपोआप लॉक होईल.

Ola इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये कंपनीनं 3.9kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसंच या स्कूटरची इलेक्ट्रीक मोटर 8.5kW चा पीक पॉवर जनरेट करते. दरम्यान 750W क्षमतेच्या पोर्टेबल चार्जरच्या माध्यमातून ही बाईक जवळपास 6 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते.

तर दुसरीकडे कंपनीनं यासाठी एक सुपर चार्जरही आणला आहे. सुपर चार्जरच्या माध्यमातून ही स्कूटर केवळ 18 मिनिटांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

एकदा ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 180 ते 190 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. इतकंच नाही तर ही स्कूटर केवळ 3 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते.