300Km ची रेंज...; लवकरच येतेय स्वस्तातली MG Comet! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 06:32 PM2023-03-02T18:32:44+5:302023-03-02T18:38:22+5:30

लूक आणि डिझाईनसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही कार हॅचबॅक कार प्रमाणेच दिसते...

मॉरिस गॅरेजने (MG Motor) गुरुवारी विविध प्रकारच्या कयासांना पूर्णविराम देत आपल्या इलेक्ट्रिक कारचे नाव जाहीर केले आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या नव्या इलेक्ट्रिक कारला कंपनीने MG Comet EV असे नाव दिले आहे.

महत्वाचे म्हणजे, कंपनी भारतीय बाजारात लवकरच Wuling’s Air EV वर बेस्ड एक स्वस्तातली इलेक्ट्रिक कार आनेल, जी ग्लोबल मार्केटमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरू होती. यापूर्वी, ही इलेक्ट्रिक कार टेस्ट दरम्यान अनेकवेळा भारतीय रस्त्यांवर दिसली आहे.

कशी आहे नवी MG Comet EV - लूक आणि डिझाईनसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही कार हॅचबॅक कारसारखीच दिसते. मात्र तिचा बॉक्सी लुक इतर कुठल्याही हॅचबॅकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. हिची लांबी केवळ 2.9 मीटर असून तिला 3 दरवाजे देण्यात आले आहेत. अर्थात, या कारला दोन साइड गेट्स आणि मागील बाजूस एक टेलगेट देण्यात आले आहे.

कारमध्ये चार सीट्स देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या कारच्या केबिनमध्ये चांगला स्पेस मिळतो, असा दावाही कंपनीने केला आहे. या कारला 2,010mm चा व्हीलबेस मिळतो. जो केबिनला प्रशस्त बनवण्यास मदत करतो.

भारतीय बाजारात सादर करण्यात येणारी ही कार इंडोनेशियात विकल्या जाणार्‍या मॉडेल प्रमाणेच आहे. हिला समोरील बाजूस एक रॅपराउंड स्ट्रिप देण्यात आली आहे. यात एलईडी लायटिंग एलिमेंट्स मिळतात, जे विंग मिररपर्यंत जाऊन संपतात.

साइड प्रोफाईलमधील अलॉय व्हील विंडो लाइन आणि बॉडीवरील कॅरेक्टर लाइन्स देण्यात आले आहे. ज्यामुळे या कारला स्पोर्टी लुक मिळतो.

खरेतर कंपनीने केवळ या इलेक्ट्रिक कारच्या नावाचीच घोषणा केली आहे. हिच्या पॉवरट्रेन अथवा बॅटरी पॅकसंदर्भात कसल्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, कंपनी या कारसोबत 20 ते 25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देऊ शकते.

महत्वाचे म्हणजे ही कार सिंगल चार्जमध्ये 200 ते 300 किलोमीटर पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. यात कंपनी सिंगल फ्रंट एक्सल मोटर देईल. जी 68hp एवढी पॉवर जनरेट करू शकते.

फीचर्स आणि किंमत - सध्या या कारचे केवळ एक्स्टेरिअर फोटच शेअर करण्यात आले आहेत. मात्र कंपनी या कारच्या केबीनमध्ये 10.25 इंचाची स्क्रीन देऊ शकते. याशिवाय यात कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, डुअल-टोन इंटिरिअर, व्हॉईस कमांड, वायरलेस अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटो सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. याशिवाय या छोट्या कारमध्ये सनरूफ देखील दिले जाऊ शकते.

खरे तर यासंदर्भात संपूर्ण माहिती येणाऱ्या काळातच समोर येऊ शकते. वृत्तांनुसार कंपनी वर्षाच्या मध्यात ही कार लॉन्च करू शकते. तसेच हिची किंमत 10 लाख रुपयांच्या आत निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.